पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबर-जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत आम्ही आठ जागांची मागणी करणार आहोत. निवडणुकांबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने थोडा उशीर होत आहे. तसेच लोकसभेसाठी दोन जागांची मागणी करणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. संघटना वाढविण्यासाठी आरपीआयचे मेळावे, बैठका सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील आढावा बैठक शनिवार (दि. 12) आकुर्डीत झाली.
बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी आठवले यांची पत्रकार परिषद झाली. महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. पुढे आठवले म्हणाले की, नागालँडमध्ये आरपीआयचे आमदार आहेत. तिथे प्रादेशिक पक्ष म्हणून आमच्या पक्षाला मान्यता आहे. राज्यातही पक्षाला मान्यता मिळवायची आहे. त्यासाठी संघटना वाढवीत आहोत, लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. यासाठी दोन जागांची मागणी करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. ही जागा आरपीआयला मिळावी. याबरोबरच मुंबई आणि विदर्भात आरपीआयची राजकीय ताकद आहे.
याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 40 जागा निवडून येतील असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. मणिपूरबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती; परंतु विरोधकांच्या गोंधळामुळे मणिपूरवर चर्चा झाली नाही, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.
हेही वाचा :