पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रदूषणात वाढ झाल्याने दिल्ली सरकारने ठराविक वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्यास २० हजारांचा दंड आकारला आहे. (Delhi Pollution update) याबाबत शुक्रवारी (दि.४) दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतरित्या सांगितले आहे. राजधानीतील PM2.5 प्रदूषणापैकी 30 टक्के भुकटी जाळल्याने दिल्लीची हवेची गुणवत्ता दुसऱ्या दिवशीही "तीव्र" राहिली आहे असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंदाज वर्तवणारी संस्था सफर (SAFAR-System of Air Quality and Weather Forecasting And Research) यांनी सांगितले आहे.
दिल्ली सरकारने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) द्वारे शिफारस केलेल्या प्रदूषण-विरोधी प्रतिबंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये BS VI नसलेल्या डिझेलवर चालणाऱ्या हलक्या मोटार वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांशिवाय कोणत्याही डिझेल ट्रकला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, परिवहन विभागाच्या आदेशानुसार सर्व सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रकना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल.
दिल्लीत नोंदणीकृत डिझेलवर चालणाऱ्या मध्यम आणि अवजड वाहनांना अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांशिवाय दिल्लीत चालण्याची परवानगी दिली जाणार नाही. दिल्ली परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की BS-III पेट्रोल आणि BS-IV डिझेल लाइट मोटार वाहनांना दिल्लीच्या NCT च्या अखत्यारीतील भागात चालविण्यास बंदी घालण्यात येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "या प्रतिबंधांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत ₹ 20,000 चा दंड आकारला जाऊ शकतो." प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यात येणार आहे. परिवहन विभाग 60 दिवसांसाठी DTC मार्फत 1,000 पर्यंत खाजगी CNG कॉन्ट्रॅक्ट कॅरेज बस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. ही सुविधा 90 दिवसांपर्यंत वाढवले जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात ५०० बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत ही योजना लागू राहील.
वाहतूक मंत्री कैलाश गहलोत म्हणाले, "शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी दिल्ली कटिबद्ध आहे." सर्व जीवनावश्यक वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर कोणत्याही क्षणी परिणाम होणार नाही हे महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने बंदीच्या बाहेर ठेवण्यात आली आहेत. मी सर्व नागरिकांना यात आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करतो आणि आवश्यक नसलेला कोणताही प्रवास टाळा आणि शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरा," ते म्हणाले.
हेही वाचा