कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर गेल्या सव्वा वर्षापासून शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्यास दिल्ली पोलिसांनी सुुरुवात केली आहे. त्यानुसार टिकरी सीमेपाठोपाठ गाझियाबादला जोडणार्या गाझीपूर सीमेवरील अडथळेदेखील शुक्रवारी दूर करण्यात आले. (farmer protest)
रस्त्यावर सुरु असलेले आंदोलन आणि अडथळ्यांमुळे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नागरिक अक्षरशः वैतागले होते. या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील अडथळे दूर केले जात असल्याची माहिती दिल्ली पोलिस दलाकडून देण्यात आली. दिल्लीवरुन गाझियाबादमार्गे मेरठला जाण्यासाठी एनएच 9 हा महत्वाचा मार्ग आहे.
दिल्ली-गाझियाबाद ही जुळी शहरे असल्याने दररोज लाखो लोकांना या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. आंदोलन आणि बॅरिकेड्समुळे दीड तासाचा प्रवास तीन ते चार तासांचा झाला होता आणि यामुळे दिल्ली एनसीआर क्षेत्रातील लोक अक्षरशः वैतागले होते. मोठमोठ्या जेसीबी आणि क्रेन्सच्या मदतीने मार्गावर लावण्यात आलेले सिमेंट आणि दगडाचे बॅरिकेड्स शुक्रवारी सकाळी हटविण्यात आले.
पोलिसांच्या निवार्यासाठी बनविण्यात आलेले शेडही हटविण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने तूर्तास मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी आंदोलकांची कठोर शब्दांत खरडपट्टी काढली होती.
रस्ते कायमच्यासाठी बंद केले जाऊ शकत नाहीत, असे त्यावेळी न्यायालयाने सांगितले होते.
यानंतर आंदोलकांची भूमिका मवाळ झाली होती. दिल्ली-हरियानाला जोडणार्या टिकरी बॉर्डरवरील बॅरिकेड्स गुरुवारी हटविण्यात आले होते.
दरम्यान सीमा खुल्या करण्यात आल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
रस्ते रिकामे झाल्यामुळे आम्ही परत दिल्लीत जाऊन संसदेत शेतमाल विकणार आहोत. शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतात, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यानुसार ट्रॅक्टर भरुन आम्ही शेतमाल संसदेत नेऊ व तिथे तो विकू. वाटेत कोण अडवतो, तेही आम्ही पाहू, असा इशारा टिकैत यांनी दिला.