Latest

IFFI Goa 2023 : भारतीय संस्कृतीत चित्रपटांबद्दल खोलवर प्रेम: दिग्दर्शक पावो मारिन्कोविच यांचे गौरवोद्गार

अविनाश सुतार


पणजी: चित्रपटांबद्दलचे प्रेम भारतीय संस्कृतीत खोलवर रुजले आहे, असे बोस्नियन पॉट 'चे दिग्दर्शक पावो मारिन्कोविच यांनी सांगितले. गोव्यामध्ये आयोजित इफ्फी ५४ मध्ये माध्यम प्रतिनिधी आणि चित्रपट रसिकांशी संवाद साधताना त्यांनी आपली भावना मांडली. IFFI Goa 2023

क्रोएशियन आणि जर्मन भाषेत बनवलेला बोस्नियन पॉट हा चित्रपट इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट इमिग्रेशन (स्थलांतर), स्वतःची ओळख आणि जीवन घडवण्यामधील कलेची भूमिका या संकल्पनांचा शोध घेतो. हा चित्रपट फारुक शेगो या बोस्नियन लेखकाची कथा सांगतो. ज्याच्यावर इमिग्रेशनच्या कठोर नियमांमुळे ऑस्ट्रियातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. तिथे राहण्यासाठी त्याला हे सिद्ध करावे लागणार आहे, की त्याने ऑस्ट्रियन समाजावर सांस्कृतिक प्रभाव पाडला आहे. या संकटातून त्याची सुटका करणारा शेवटचा आशेचा किरण आहे, तो म्हणजे फारुकने त्याच्या तारुण्यात लिहिलेले नाटक सादर करण्यासाठी उत्सुक असलेला एक ऑफ थिएटर ग्रुप. त्यासाठी काहीशा अनिच्छेनेच थिएटरकडे परतल्यावर, फारुकचा एक साहसी प्रवास सुरु होतो, जो त्याला कलात्मकदृष्ट्या आव्हान देतो आणि आत्म-शोधासाठी प्रवृत्त करतो. IFFI Goa 2023

बोस्नियन पॉट चित्रपटाबद्दल बोलताना मारिन्कोविच म्हणाले की, हा प्रवास सोपा नव्हता. क्रोएशिया, ऑस्ट्रिया आणि बोस्निया या तीन देशांमधील कलाकारांच्या सहयोगाने केलेले हे काम होते. क्रोएशियन म्हणून त्यांना स्वत: च्या अनुभवांवरून हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली, कारण चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच त्यांनाही ऑस्ट्रियामध्ये स्थलांतरित होताना अशाच समस्यांचा सामना करावा लागला होता. "माझे मूळ, हीच माझी प्रेरणा आहे. चित्रपटात दिसतो, तो राजकीय संघर्ष, पण नायक फारुकचा अंतर्गत संघर्ष देखील आहे, बाहेरच्या देशातून आल्यामुळे, इथले लोक त्याच्या कामाला महत्व देत नाहीत." ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की बोस्निया अजूनही युरोपियन युनियनच्या बाहेर असल्यामुळे अजूनही या समस्यांना तोंड देत आहे, आणि चित्रपटाची संकल्पना आजही युरोपमधील राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे.

त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे महत्त्व देखील स्पष्ट केले, जे बोस्नियामधील समुदायाच्या पारंपारिक खाद्य पदार्थाचे प्रतीक आहे, ज्याला बोस्नियन पॉट म्हणतात, जिथे प्रत्येक सदस्य बंधुता आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून पदार्थात एका व्यंजनाची भर घालतो. हा चित्रपट स्वतःची ओळख, समुदाय आणि स्वीकृती या संकल्पनांच्या माध्यमातून हीच भावना प्रतिबिंबित करतो.

दिग्दर्शक मारिन्कोविच यांनी भारतीय प्रेक्षकांची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले. त्यांनी खुलासा केला की भारतीय प्रेक्षकांकडून त्यांना नेहमीच अनपेक्षितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, आणि केरळमधील चित्रपट महोत्सवातील त्यांचे अनुभवही त्यांच्या कायम स्मरणात राहतील.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT