पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची तीव्रात पुन्हा एकदा वाढली आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर जोरदार हवाई हल्ले सुरु केले आहेत. रशियन सैन्याने खेरसन प्रांतातील काखोव्का धरणावरही क्षेपणास्त्र डागले. यामुळे दक्षिण युक्रेनमध्ये पूर आला आहे. ( Russia-Ukraine War ) अणुभट्टी थंड करण्यासाठी पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असलेल्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पासह अनेक मानवी वस्त्यांवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती युक्रेनने व्यक्त केली आहे.
युक्रेनच्या खेरसन प्रातांचे गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सांगितले की, रशियन सैन्याने काखोव्का धरणावर क्षेपणास्त्र डागत धरण फोडले. या हल्ल्यानंतर डनिप्रो नदीच्या युक्रेन-नियंत्रित पश्चिम किनाऱ्यावरील अनेक गावे रिकामी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी आपत्कालीन सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. धरणावर झालेल्या हल्यास रशियन सैन्य जबाबदार असल्याचे म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की बैठक घेणार आहेत, असे युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी आज ( दि.६) ट्विटरच्या माध्यामातून स्पष्ट केले.
रशियाच्या हल्ल्यात काखोव्का जलविद्युत केंद्रच उद्ध्वस्त झाले आहे. याचा गंभीर परिणाम झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर होणार आहे. कारण काखोव्का जलाशयातील पाणी आण्विक अणुभट्ट्यांना थंड करण्यासाठी वापरतात, अशी माहिती युक्रेनच्या स्टेट एजन्सी फॉर रिस्टोरेशनचे प्रमुख मुस्तफा नय्यम यांनी दिली. धरणाजवळील स्थलांतर सुरू झाले आहे आणि पाच तासांत पाणी गंभीर पातळीवर पोहोचेल.
काखोव्का धरण आणि जलविद्युत केंद्र हे १९५६ मध्ये बांधण्यात आले. युक्रेनमधील सर्वात मोठ्या ऊर्जा सुविधांपैकी एक, अशी त्याची ओळख होती. आता रशियाने त्याच्यावर हल्ला केल्याने त्याचे दूरगामी परिणाम होतील, शेकडो बळी पडतील, अशी भीतीही नय्यम यांनी व्यक्त केली आहे.
रशियाने धरणावर केलेल्या हल्ल्यांनतर जलायशातून धरणातील एका मोठ्या छिद्रातून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच धरणाच्या आजूबाजूला तीव्र स्फोट आणि त्यातून पाणी वाहत असल्याचे दिसून आले. युक्रेनच्या लष्कराने फेसबुकच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, " या हल्ल्यामुळे झालेल्या विनाशाची तीव्रता आणि आणि पुराचे संभाव्य क्षेत्र स्पष्ट केले जात आहेत.
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. कही दिवसानंतर रशियन सैन्याने खेरसन प्रदेश ताब्यात घेतला, युक्रेन आणि रशिया यांनी नेहमीच एकमेकांवर धरण, जलविद्युत केंद्र आणि अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्याचा आरोप केला.
हेही वाचा :