पुढारी ऑनलाईन : सध्या मान्सून तळकोकणात आहे. पण बिपरजॉय चक्रीवादळाने आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनची गती मंदावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (UTs) अलर्ट जारी केला आहे. यात गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये १४-१५ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १६ जून रोजी उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या बहुतांश भागांत हलका ते मध्यम आणि काही भागात मुसळधारेची शक्यता आहे. (Cyclone Biparjoy)
१४ जून रोजी सौराष्ट्र आणि कच्छमधील कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. १५ जून रोजी कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागढ येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या किनारी भागात अलर्ट जारी केला आहे. कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर आणि मोरबी या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. बिपरजॉयची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी ते पुन्हा वेग घेऊ शकते आणि यामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Cyclone Biparjoy)
ईशान्य अरबी समुद्रावरील अतिशय तीव्र चक्रीवादळ "बिपरजॉय" गेल्या ६ तासात ३ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ गुजरातच्या जखाऊ बंदराच्या नैऋत्येस सुमारे २८० किमी, देवभूमी द्वारकाच्या पश्चिम-नैऋत्येस २९० किमी, नलियाच्या पश्चिम-नैऋत्येस ३०० किमी, पोरबंदरच्या नैऋत्येस ३४० किमी आणि कराची (पाकिस्तानच्या) दक्षिण-नैऋत्येस ३४० किमी अंतरावर ईशान्य अरबी समुद्रावर घोंघावत आहे.
पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, गुजरातच्या किनारी भागात जाणाऱ्या सुमारे ९५ गाड्या १५ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :