नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सायबर सुरक्षेचा मुद्दा हा केवळ डिजिटल जगताचा मुद्दा राहिला नसून तो राष्ट्रीय सुरक्षेचाही मुद्दा बनला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी शुक्रवारी एका वेबिनारद्वारे संबोधित करताना केले.
गुलामीत असतानाच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही वर्षापर्यंत तरी देश संरक्षण साहित्याच्या उत्पादनाच्या बाबतीत मजबूत होता, मात्र नंतर हळूहळू परिस्थिती ढासळत गेली, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. शस्त्रास्त्रांच्या आयातीची प्रक्रिया दीर्घकाळ चालते, अशा स्थितीत प्रत्यक्षात शस्त्रे देशात येईपर्यंत ती जुनी झालेली असतात. यावर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे देशातच आधुनिक शस्त्रास्त्रे बनविणे, असे मोदी (Prime Minister Modi) यांनी नमूद केले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांनी मोठी कामगिरी बजावली होती, असे सांगत मोदी (Prime Minister Modi) पुढे म्हणाले की, शस्त्रास्त्र निर्मितीमधील भारताची मजबुती नंतर कमजोर करण्यात आली. क्षमता असूनही भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत मागे पडत गेला. केंद्रात रालोआचे सरकार आल्यानंतर स्थिती बदलण्याचा निर्धार आम्ही केला. संरक्षण क्षेत्रासाठीच्या बजेटपैकी ७० टक्के वाटा यावेळी देशी कंपन्यांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. आयटी क्षेत्र ही देशाची खूप मोठी ताकत आहे. जितकी ही ताकत संरक्षण क्षेत्राकरिता वापरली जाईल, तितके आपले संरक्षण क्षेत्र मजबूत होईल. गेल्या सहा वर्षात देशाच्या संरक्षण साहित्य निर्यातीत सहपटीने वाढ झाली आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जगातील ७५ पेक्षा जास्त देशांना भारत संरक्षण साहित्याची निर्यात करीत आहे.
हेही वाचलंत का ?