पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोसरी येथील वेदिका शिंदे ही चिमुरडी दुर्धर आजाराने ग्रासली असून तिच्या उपचारासाठी पैशांची आवशक्यता आहे, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल करून तीन मोठ्या कंपन्यांनी जगभरातून पैसे गोळा केले. यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच, पैसे गोळा करताना संबंधित कंपन्यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 या कायद्याचे उल्लंघनदेखील केले आहे. ही बाब निदर्शनास आल्याने महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शुक्रवारी (दि. 25) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्पॅक्ट गुरू कंपनीचे मालक पीयूष जैन, केट्टो कंपनीचे मालक वरुण शेठ, मिलाप कंपनीचे मालक मारुख चौधरी यांच्यासह संबंधित कंपन्यांचे इतर संचालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक शिवाजी मोहारे (37) यांनी शुक्रवारी (दि. 25) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरात वेदिकाचा जन्म झाला. चार महिन्यानंतर तीला शारीरिक त्रास असल्याचे शिंदे कुटुंबीयांच्या लक्षात आले. दरम्यान, काही तपासणीअंती वेदिकाला एसएमए टाईप-1 हा गंभीर आजार असल्याचे समोर आले. वेदिकाचा आजार भारतात दुर्मिळ असून तिच्यासाठी अमेरिकेतून इंजेक्शन आणण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, वेदिकासाठी अत्यावश्यक असलेल्या इंजेक्शनची किंमत सोळा कोटी असल्याचेही डॉक्टरांनी शिंदे कुटुंबीयांना सांगितले.
दरम्यान, वेदिकासाठी शिंदे दाम्पत्यांनी क्राऊड फंडिंगद्वारे पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर वैदिकाच्या नावाने कॅम्पेन चालवण्यात आले. अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वेदिकाच्या उपचारासाठी मदतही केली. याच दरम्यान, आरोपींनीदेखील त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून क्राऊड फंडिंग करण्यास सुरुवात केली. वेदिकाचे फोटो पोस्ट करून जगभरातून मदत मिळवण्यास सुरुवात केली. मदतीचा ओघ सुरू असताना 1 ऑगस्ट 2021 रोजी वेदिकाने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर शिंदे दाम्पत्याने सर्व माध्यमातून वेदिकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करीत मदतकर्त्यांचे आभार मानले.
आरोपींनी मात्र वेदिकाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही मदतीसाठीचे आवाहन सुरूच ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच, मृत वेदिकाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची देखील शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. वेदिकासाठी मदत मिळवताना संबंधित कंपन्यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 या कायद्याचे उल्लंघनदेखील केले आहे.
या बाबी विचारात घेत महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे 74 अन्वये ज्या बालकास संगोपनाची अथवा संरक्षणाची गरज आहे, त्यांचे फोटो किंवा तपशील प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध आहे. या कायद्यानुसार लहान मुलांचे फोटो वापरून पैसा गोळा करणे, हे पूर्णपणे गैर आहे. तसेच, कायद्यानुसार क्राऊड फंडिंग हा प्रकार भीक मागण्यामध्येच मोडतो.
मुलांचे फोटो वापरून क्राऊड फंडिंग केल्याबाबत संबंधित कंपन्यांना महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली होती. यावर आरोपी पीयूष जैन यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, उच्च न्यायालयानेदेखील जैन यांची मागणी फेटाळून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
वैदिकाच्या नावावर गोळा करण्यात आलेली रक्कम मोठी असल्याचा संशय पोलिसांना आहे. तीनही कंपन्यांनी जगभरातून मदत मिळवली आहे. यातील किती मदत वेदिकासाठी वापरण्यात आली, वेदिकाच्या मृत्यूनंतर आरोपींनी पैसे गोळा केले आहेत का, एकूण किती पैसे गोळा केले, याचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे.
मृत वेदिका शिंदेच्या नावावर आरोपी पैसे गोळा करीत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
– भास्कर जाधव, वरिष्ठ निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे.
हेही वाचा