म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
मंगळवारचा दिवस कळंगुट मतदारसंघ राजकीय घडामोडीवरून गाजला. मंत्री मायकल लोबो यांनी आपल्याच भाजपावर कुरघोडी घेत पक्षातील नेत्यांनाच लक्ष्य केले.
दुसरीकडे मायकल लोबो यांनी कळंगुटमध्ये विरोध जुगारून जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. काही देशप्रेमी तसेच समविचारी लोकांनी एकत्रित येत मंत्री लोबो यांच्या या कृतीचा काळे झेंडे दाखवीत जोरदार निषेध नोंदविला.
काही महिन्यांपूर्वी कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीवरून मायकल लोबो तसेच पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांना हिंदू संघटनांनी लक्ष्य केले होते. वाहतुकीच्या मुद्यांवरून ही मिरवणूक पोलिसांनी अडविली होती.
शिवाय मंत्री यांच्या सांगण्यावरून या मिरवणुकीत पोलिसांनी खो घालण्यात आला, असा आरोप या संघटनेने केला होता. कळंगुट मतदारसंघ मंचने या पुतळ्याला यापूर्वीच हरकत घेत संबंधिताकडे निवेदन सादर केले होते. यावेळी प्रेमानंद दिवकर, गुरुदास शिरोडकर, सुदेश मयेकर, सुदेश शिरोडकर, शैलेंद्र वेलिंगकर हजर होते.
गुरुदास शिरोडकर म्हणाले की, मुळात मंत्री मायकल लोबो यांची ही कृती निषेधार्थ आहे. हा पुतळा गोव्यातील स्वातंत्र सैनिकांचा अवमान आहे. कारण या सैनिकांनी पोर्तुगीजांकडे झगडून गोव्याला स्वातंत्र्य मिळविले.
असे असताना गोव्याच्या 60व्या मुक्ती वर्षांत हा पुतळा उभारणे निषेधार्थ आहे. आम्ही मंत्री लोबो यांचा धिक्कार करतो. रोनाल्डो ऐवजी गोव्यातील फुटबॉलपटूचा पुतळा उभारण्याची गरज होती.
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील उत्कृष्ट फुटबॉलपटू आहे. काहीजण विनाकारण राजकारण करीत असून, काळे झेंडे दाखविणे चुकीचे आहे. खेळात कोणीही राजकारण आणू नये. निवडणुकावेळी या राजकारणाला वेळ द्यावा, अशी प्रतिक्रिया मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी दिली.
हेही वाचा