Latest

Cristiano Ronaldo Rule : ‘मँचेस्टर’मध्ये लागू होणार ‘रोनाल्डो नियम’! खेळाडूंच्या पगाराला लागणार कात्री

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cristiano Ronaldo Rule : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबला सोडचिठ्ठी दिली. या घटनेनंतर मँचेस्टर युनायटेडने संघातील आपल्या खेळाडूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. क्लब आता 'ख्रिस्तियानो रोनाल्डो' नियम बनवणार असल्याचे समोर आले आहे. या नियमानुसार, मँचेस्टर युनायटेडने खेळाडूंना दर आठवड्याला जास्तीत जास्त 200,000 लाख पौंड (सुमारे 1.98 कोटी) वेतन दिले जाणार आहे.

लंडनमधील प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डो नियम लागू करून मँचेस्टर युनायटेड क्लब आपल्या खेळाडूंमधील पगारातील तफावत कमी करणे हे क्लबचे उद्दिष्ट आहे. तसेच क्लब ड्रेसिंग रूममधील खेळाडूंमध्ये असणारी इर्ष्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता तेव्हा त्याला करारानुसार दर आठवड्याला 5 लाख पौंड (4.97 कोटी) मिळत होते, जी इतर खेळाडूंच्या तुलनेत खूप जास्त रक्कम होती.

'रोनाल्डो नियमाचा' फटका खेळाडूंना बसणार

जर 'रोनाल्डो नियम' लागू झाला तर गोलरक्षक डेव्हिड डी गियाला सर्वाधिक फटका बसेल. या स्पॅनिश खेळाडूला दर आठवड्याला 375,000 पौंड (जवळपास 3.72 कोटी) मिळतात. तर राफेल वराणे, हॅरी मॅग्वायर, कासेमिरो आणि फर्नांडिस हे वरिष्ठ खेळाडू समान वेतनाच्या कॅपमध्ये असून त्यांना दर आठवड्याला जवळपास 1.80 ते 2 कोटी रुपये मिळतात.

स्टार फॉरवर्ड मार्कस रॅशफोर्ड यालाही मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मँचेस्टर युनायटेड रॅशफोर्डबरोबरचा करार एका वर्षाने वाढवण्यास उत्सुक आहे म्हणजे त्याचा सध्याचा करार 2024 मध्ये संपेल. मात्र, दुसरीकडे पॅरिस सेंट-जर्मेन रॅशफोर्डला आपल्या संघासोबत जोडण्यास उत्सुक आहे. त्यामुळे रॅशफोर्ड मँचेस्टर सोबतचा करार एका वर्षासाठी वाढवेल याची शाश्वती नाही.

वादामुळे रोनाल्डोने क्लब सोडला

ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसोबतच्या वादामुळे क्लब सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मँचेस्टर युनायटेडने म्हटले होते की, 'हा निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यात आला आहे. संघासोबत दोन हंगाम घालवल्याबद्दल आणि उत्तम योगदान दिल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो. रोनाल्डोने संघासाठी 346 सामन्यात 145 गोल केले. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. एरिक टेन हॉग यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करण्यावर क्लबचा भर आहे.'

सौदीच्या अल नासर क्लबशी रोनाल्डो करारबद्ध

मँचेस्टर युनायटेड सोडल्यानंतर रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल-नासर क्लबसोबत विक्रमी करार केला. तीन वर्षांच्या करारात रोनाल्डोला वर्षाला सुमारे 1800 कोटी रुपये मिळणार आहेत. या करारानंतर रोनाल्डो इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT