Latest

मोठी बातमी ! आ. राम शिंदेंना धमकी देणार्‍या सराईत गुन्हेगारास मध्यप्रदेश मधून अटक

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : फेसबुक लाइव्हद्वारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी सागर गवसणे याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी सागर सुभाष गवासणे (वय ३४) हा मूळचा जामखेड तालुक्यातील आहे. सध्या तो पुण्यातील वाकड परिसरात राहत आहे. गुन्हा केल्यानंतर तो मध्य प्रदेशात पळून गेला होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आरोपी गवासणे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध नगरसह बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न आणि अवैधरित्या शस्त्र बाळगल्याचे गुन्हेही त्याच्याविरूद्ध आहेत. त्यामुळे पोलिस याचा तपास गांभीर्याने करीत आहेत.

गेल्या महिन्यात ३० मे रोजी आरोपी गवासणे याने आमदार शिंदे यांना धमकी दिली होती. शिंदे यांचे कार्यकर्ते व जामखेड चे नगरसेवक अमित अरुण चिंतामणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चोंडी येथील कार्यक्रमाचे तयारी करीत असताना सागर गवासणे याने त्यांना मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात, त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाही तर पाहून घेईन अशी धमकी दिली होती. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे यांचे नाव घेऊन घरात घुसून मारीन, अशी धमकी दिली होती. दोन राजकीय पक्षाच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक तपासासाठी सक्रीय झाले. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, प्रशांत राठोड, राहुल गुड्डू, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपी गवासणे वाकड येथे राहत असला तरी तो मध्य प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उज्जैन व इंदौर परिसरात फिरून आरोपीची माहिती काढली. त्याचा ठावठिकाणा लागताच त्याला ताब्यात घेऊन जामखेडला आणण्यात आले.

अधिक चौकशी केली असता आरोपी सागर सुभाष गवासणे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पुढे आले. त्यांच्या विरुद्ध अहमदनगर व बाहेरच्या जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. जामखेड, बीड, धाराशीव येथे गुन्हे दाखल आहेत. २००८ पासूनचे हे गुन्हे आहेत. धमकी देणे, मारहाण करणे एवढेच नव्हे तर खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, भारतीय शस्त्र कायद्याचा भंग करून शस्त्र बाळगणे, दरोडा असे विविध गुन्हे त्याच्याविरूद्ध दाखल आहेत.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT