नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या 'कफ सिरप' वर विविध देशांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यातीसाठीच्या कफ सिरपसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच अशा प्रकारचे कफ सिरप निर्यात करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. येत्या १ जूनपासून हा नियम लागू होणार आहे.
विदेश व्यापार महासंचलनालयाकडून (डीजीएफटी) याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. सरकारी लॅबमधील चाचणी व त्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय कफ सिरपची निर्यात करता येणार नाही, असे डीजीएफटीने आदेशात म्हटले आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या चार कफ आणि कोल्ड सिरपच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने गेल्यावर्षी अॅलर्ट जारी केला होता. या कफ सिरपमुळे गांबिया देशात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय कफ सिरप किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.
डब्ल्यूएचओच्या निर्देशानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने कफ सिरपची चौकशी सुरू केली होती. भारतातून पाठविण्यात आलेल्या कफ सिरपच्या अनुषंगाने उझबेकिस्तानने सुध्दा प्रश्न उपस्थित केले होते. कफ सिरपचा वापर केल्यानंतर १८ लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानने केला होता.
हेही वाचा :