Latest

Cough causes and solutions : छाती आणि घशातील कफ; जाणून घ्या कारणे आणि उपाय

दिनेश चोरगे

Cough causes and solutions : वारे मान्सूनचे आहे आणि मान्सूनचा प्रवास आपल्या दिशेने सुरू आहे. ऋतू बदलत आहे. आणि ऋतूबदलाच्या अशा काळात काही विशिष्ट रुग्णांना तब्येतीसाठी धावपळ करावी लागते. सर्दी, पडसे, घसा खवखवणे, घसा दुखणे, दम लागणे, छातीत घरघरणे, खोकला येणे आणि खोकल्यावाटे कफ पडणे या प्रकारच्या तक्रारी अशा काळात अनेकांच्या वाट्याला येतात.

निसर्गाने आपल्या शरीराची रचना करताना अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतली आहे. ज्या नाकावाटे आपण श्वास आत घेतो, त्या श्वसनमार्गात म्हणजे, नाक-नाकाच्या आतील मागचा भाग-घसा आणि श्वासनलिका यांच्या आतील स्तराखाली स्राव स्रवणार्‍या ग्रंथी असतात. श्वासमार्गाचे काम सामान्य राहण्यासाठी आणि श्वासावाटे आगंतुकपणे आत आलेला एखादा कण किंवा त्या कणाद्वारे आलेले जिवाणू- विषाणू यांचा आत शिरकाव होऊ न देता , या स्रावांच्या मदतीने बाहेर टाकून देण्यासाठी श्वसनमार्गात स्रावांची निर्मिती होत असते. यालाच आपण कफ असे म्हणतो.

Cough causes and solutions : त्रास सुरू होतो तेव्हा कफची जाणीव होते

सामान्यपणे हे अतिशय पातळ असतात. त्यांचे काम अहोरात्र सुरू असते. आपण श्वास घेत असतो, हे जसे आपल्या लक्षात नसते, तसेच अशा स्रावांचे सर्वसामान्यपणे चाललेले काम आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा हे स्राव खूप प्रमाणात वाढतात किंवा हे स्राव घट्ट होतात किंवा घशातून असे स्राव बाहेर टाकण्यास त्रास होऊ लागतो, तेव्हा त्याची आपल्याला जाणीव होते. नाकावाटे शरीरात प्रवेश करणारे विषाणू, जिवाणू किंवा कोणत्याही प्रकारचे जंतू यांना पहिल्या टप्प्यात नामोहरण करण्यासाठी अशा स्रावांची निर्मिती निसर्गाने केलेली असते. थोडक्यात रोगप्रतिकारशक्तीचे हे पहिले पाऊलच म्हणता येईल. या टप्प्यातच कोणत्याही जंतूला शरीरातून बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न केले जातात. जर काही कारणाने आपली रोगप्रतिकारक्षमता कमी पडली किंवा जंतूंची संख्या-ताकद वाढली किंवा कोरोनासारखा नवीनच एखादा विषाणू आला, तर शरीराची ही रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते. आणि मग नाक आणि श्वसन मार्गातील स्रावांचे प्रमाण वाढू शकते. याला आपण कफ वाढला असे म्हणतो.

मधुमेह, विविध प्रकारचे कर्करोग, श्वसनमार्गाचे दीर्घकालीन विकार , एचआयव्हीची बाधा , एस. एल. ई. – संधीवातासारखे विकार , दीर्घकाळ अंथरुणावर पडून असणे… अशा वेगवेगळ्या स्थितीत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली असते. जंतुसंसर्गामुळे बाधित झालेल्या श्वसनसंस्थेच्या भागानुसार जसे की नाक, सायनस, घसा, स्वरयंत्र, श्वसननलिका किंवा फुफ्फुसे इत्यादीनुसार कफाची लक्षणे बदलतात. Cough causes and solutions

नाक गळणे, नाक वाहणे, नाकातून घशात कफ येणे, घशात कफ अडकल्यासारखे वाटणे, घशात खवखवणे, सारखे खाकरल्यासारखे करणे, नाकातून किंवा घशातून शाबू सारखे चिकट कण वारंवार पडणे , खोकल्यातून कफ बाहेर पडणे, कफ वारंवार चिकट होणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी रुग्ण सांगत असतात. बर्‍याच लोकांना कफाच्या तक्रारी बरोबर रात्रीच्या खोकल्याचा त्रास होतो. रात्री झोपल्यानंतर मध्येच अस्वस्थ होऊन उठावे लागते. कफ अडकल्याचा भास होतो. रात्री श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. कफाच्या अशा एखाद्या तक्रारीमुळे अनेक जण हैराण झालेले असतात.

Cough causes and solutions : 'पोस्ट नेजल ड्रीप'

बरेचजण यासाठी विविध स्तरावरून सुचवलेले वेगवेगळे घरगुती उपाय करत बसतात. पण आपल्याला होत असलेला त्रास हा नेमका कशामुळे होतो हे शोधून काढल्याशिवाय आणि त्या मूळ कारणावर उपचार केल्याशिवाय या तक्रारी कमी होत नाहीत. सर्दीच्या रुग्णांमध्ये नाक गळण्याचे प्रमाण लक्षणीय असते. सर्दी जर लर्जीची असेल तर, वातावरणातील बदलामुळे, ढगाळ वातावरणात, धूर, धूळ, परागकण, अगरबत्ती, डास पळवणार्‍या मॅट्स, परफ्यूमस् , विशिष्टष्ट रंग, काही औषधे, कांही खाद्यपदार्थ आणि पेये घेतल्यानंतर विशिष्ट रुग्णांमध्ये नाक गळण्याचा त्रास होतो. नाकाच्या बाजूला आणि वर कवटीच्या हाडात पोकळ्या असतात. त्यांना सायनस म्हणतात. अशा सायनसमध्ये जंतुसंसर्ग होतो तेव्हा त्याला सायनोसायटिस म्हणतात. या स्थितीत नाकातील स्राव घट्ट होतात. जेव्हा नाकातील स्राव घशात जातात, तेव्हा त्या स्थितीला 'पोस्ट नेजल ड्रीप' असे संबोधले जाते. Cough causes and solutions

जेव्हा घशात जंतुसंसर्ग होतो , तेव्हा घसा जास्त दुखू लागतो. तेथे लालसरपणा येतो. कफ अधिक चिकट होतो. कफाचा रंग बदलतो. काही वेळा तो हिरवट होतो. प्रतिजैविके घेऊन वेळीच हा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर, तो खाली श्वासमार्गात जाऊ शकतो.
स्वरयंत्राला संसर्ग झाला तर आवाजात फरक पडतो. आवाज घोगरा होतो. खोकला येतो. गळ्यात दुखते. काही रुग्णांमध्ये काही कालावधीसाठी गिळताना त्रास होतो. जर तुम्ही सिगारेट किंवा बिडी ओढत असाल आणि तुमच्या आवाजात बदल झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणे आवश्यक असते. सिगारेटच्या किंवा बिडीच्या धुरामुळे श्वासनलिकेतील स्रावांचे प्रमाण वाढते. त्यात जंतुसंसर्गाची भर पडली तर कफाचे प्रमाण वाढते आणि कफ चिकट होतो. Cough causes and solutions

ज्यांना क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा ब्रॉन्कायटिसच्या कोणत्याही प्रकाराने त्रस्त केले आहे, अशा रुग्णांमध्येही कफाचा त्रास होतो. ज्या लोकांना आधीपासून दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांना दम्याचा त्रास नव्याने सुरू होतो , अशा रुग्णांनाही कफाचा त्रास होतो. अशा रुग्णांमध्ये श्वासनलिका आकुंचित होण्याबरोबर, श्वासनलिकेतील स्रावांचे प्रमाण वाढते आणि हे स्राव चिकट होतात. रात्रीच्या वेळी छातीत सुंई सुंई आवाज येत असेल किंवा घशात घरघरत असेल, तर तो दमा असू शकतो.

Cough causes and solutions : या विकारांमध्ये कफ वाढू शकते

सी ओ पी डी ( क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ) हा दम्यासारखाच एक वेगळा आणि चिवट श्वसनविकार आहे. फुप्फुसांची आकुंचन-प्रसारण क्षमता यात कमी झालेली असते. श्वास आत घेतल्यानंतर वायुकोश पूर्ण क्षमतेने भरतात पण आतील हवा त्या क्षमतेने बाहेर सोडू शकत नाहीत. अशा रुग्णांमध्ये छोट्या श्वासनलिका बाधित झालेल्या असतात. अशा रुग्णांमध्ये जेव्हा जंतुसंसर्ग होतो तेव्हा कफाचे प्रमाण वाढते. कफ घट्ट होतो. चिकट होतो. काही वेळा कफाबरोबर रक्तही पडते. अशा रुग्णांमध्ये प्रतिजैविके द्यावीच लागतात. या रुग्णांनी आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर जंतुसंसर्ग फुफ्फुसात पसरू शकतो आणि काट्याचा नायटा होतो.

श्वासनलिका रुंद होऊन राहण्याच्या विकाराला ब्राँकिक्टॅसिस असे म्हणतात. अशा विकारांमध्ये सुद्धा कफाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. या विकाराच्या मुळाशी अनेक कारणे असतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण तपासण्या करून घेऊन यावर उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. जर लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये कफाचे प्रमाण अधिक असेल तर, त्याच्या मुळाशी 'सिस्टिक फायब्रोसिस' सारखा आनुवंशिक विकार आहे का? याची शहानिशा करणे शहाणपणाचे ठरते. अशा विकारामध्ये कफाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. तसेच खूप चिकट असतो. Cough causes and solutions

पाण्याची वाफ घेणे हा कफ पातळ करण्यासाठीचा साधा घरगुती उपाय असला तरी, समाजमाध्यमातील निनावी फॉरवर्डेड मेसेजनुसार एखादा काढा घेणे हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते. वाढलेला कफ हा कशामुळे आहे? याची शास्त्रशुद्ध मीमांसा करणे आणि त्यानुसार योग्य तो उपचार घेऊन, कफ होऊ नये यासाठी जीवनशैली बदलणे हा यावरील योग्य उपाय ठरतो. Cough causes and solutions

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT