file photo 
Latest

corona death rate : कोरोनो रुग्णसंख्येत आठ पट वाढ होऊनसुद्धा मृत्यूदरात सहापट घट

backup backup

मुंबई ; अजय गोरड : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी मृत्यूदरही वेगाने घटत असल्याचे चित्र आहे. त्यातही ओमायक्रॉनबाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याची बाब पुढे आली आहे. (corona death rate)

राज्यात 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत 80 हजार 354 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, 220 रुग्णांचा (0.27 टक्के) मृत्यू झाला. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या पंधरवड्यात राज्यात केवळ 10 हजार 818 रुग्ण आढळून आले, तर 183 रुग्णांचा (1.65 टक्के) मृत्यू झाला होता.

21 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात मागील पंधरवड्यापेक्षा रुग्णसंख्येत आठ पट वाढ होऊनसुद्धा मृत्यूदरात सहापट इतकी घट झाल्याचे आकडेवारी सांगते. मागील पंधरवड्यातील रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित असल्यानेच मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

corona death rate : कोरोनाची तिसरी  लाट प्राथमिक स्थितीत

देशासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून, सध्या ती प्राथमिक अवस्थेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉन विषाणूची जगभर दिसून आलेली लक्षणे, राज्यात कमी कालावधीत वाढलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा विषाणूच्या तुलनेत पाच ते सहापट अधिक ओमायक्रॉन संसर्ग प्रसाराचा वेग पाहता ही लाट ओमायक्रॉन विषाणूचीच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 80 टक्के ओमायक्रॉन विषाणूने बाधितांचे आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारीच दिली आहे.

20 डिसेंबरनंतरचे राज्यातील बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनबाधित असण्याच्या शक्यतेला राज्याच्या आरोग्य विभागाचे (कोरोना) तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दुजोरा दिला आहे. सध्या मुंबईत समूह संसर्ग झाला आहे.

आगामी आठ-दहा दिवसांत पुण्यासह राज्यातील विविध समूह संसर्ग होऊन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल; पण जगभरातील ओमायक्रॉनबाधितांचा मृत्यू दर अल्फा व डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील घटलेल्या मृत्यूदराबाबतही तोच निष्कर्ष निघतो, असे साळुंखे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

5 डिसेंबर ते 19 या पंधरवड्यात राज्यात केवळ 10 हजार 818 रुग्ण आढळून आले तर, 183 मृत्यू झाले आहेत. या पंधरवड्यात मृत्यू दर 1.65 इतका राहिला. दुसरीकडे, 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या पंधरवड्यात 80 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर केवळ 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या पंधरवड्याचा मृत्यू दर 0.27 इतका कमी आहे. पहिल्या पंधरवड्यातील मृत्यूदराच्या तुलनेत दुसर्‍या पंधरवड्यातील मृत्यूदरात सहापट घट झाली आहे. दुसरीकडे, दुसर्‍या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 8 पट रुग्णवाढ झाली आहे.

लसीकरणामुळेही मृत्यूदरात घट

ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे.

राज्यात जवळपास 85 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. तर, 60 टक्क्यांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
पहिल्या दोन लाटा व राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.

विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रतिकारकशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमायक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT