१५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत आठ पट वाढ | पुढारी

१५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत आठ पट वाढ

मुंबई ; अजय गोरड : राज्यात 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या पंधरवड्याच्या कालावधीत 80 हजार 354 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 220 रुग्णांचा (0.27 टक्के) मृत्यू झाला. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या पंधरवड्यात राज्यात केवळ 10 हजार 818 रुग्ण आढळून आले, तर 183 रुग्णांचा (1.65 टक्के) मृत्यू झाला आहे.

21 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात मागील पंधरवड्यापेक्षा रुग्णसंख्येत आठ पट वाढ होऊनसुद्धा मृत्यूदरात सहा पट इतकी कमालीची घट झाल्याचे आकडेवारी सांगते. मागील पंधरवड्यातील रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित असल्यानेच मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉन बाधितांचा मृत्यूदर कमी दिसून आल्याने आपल्या सर्वांसाठीच ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात 20 डिसेंबरपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. तसेच ही तिसरी लाट असून सध्या ती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मानले जात आहे. ओमायक्रॉन विषाणूची जगभर दिसून आलेली लक्षणे, राज्यात कमी कालावधीत वाढलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा विषाणूच्या तुलनेत पाच ते सहा पट अधिक ओमायक्रॉन संसर्ग प्रसाराचा वेग पाहता ही लाट ओमायक्रॉन विषाणूचीच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 80 टक्के ओमायक्रॉन विषाणूने बाधितांचे आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारीच दिली आहे. 20 डिसेंबरनंतरचे राज्यातील बहुतांश रुग्ण ओमायक्रॉन बाधित असण्याच्या शक्यतेला राज्याच्या आरोग्य विभागाचे (कोरोना) तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात ज्या पद्धतीने रुग्णवाढ होताना दिसते ते पाहता ही लाट ओमायक्रॉन विषाणूचीच असल्याचे स्पष्ट आहे. सध्या मुंबईत समूह संसर्ग झाला आहे. आगामी आठ- दहा दिवसात पुण्यासह राज्यातील विविध समूह संसर्ग होऊन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल. पण जगभरातील ओमायक्रॉन बाधितांचा मृत्यूदर अल्फा व डेल्टाच्या तुलनेत कमी दिसून आला आहे. राज्यातील घटलेल्या मृत्यूदराबाबतही तोच निष्कर्ष निघतो, असे साळुंखे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

5 डिसेंबर ते 19 या पंधरवड्यात राज्यात केवळ 10 हजार 818 रुग्ण आढळून आले तर, 183 मृत्यू झाले आहेत. या पंधरवड्यात मृत्यूदर 1. 65 इतका राहिला. दुसरीकडे, 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या पंधरवड्यात 80 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर केवळ 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पंधरवड्याचा मृत्यूदर 0.27 इतका कमी आहे. पहिल्या पंधरवड्यातील मृत्यूदराच्या तुलनेत दुसर्‍या पंधरवड्यातील मृत्यूदरात सहा पट घट झाली आहे. दुसरीकडे, दुसर्‍या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 8 पट रुग्णवाढ झाली आहे.

लसीकरणामुळेही मृत्यूदरात घट

ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे. मागील पंधरा दिवसातील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यूदर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यूदर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे. राज्यात जवळपास 85 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे तर 60 टक्केहून अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

पहिल्या दोन लाटा व राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समहू प्रतिकारशक्ती (हर्ड इम्यूनिटी) तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत. विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणाने कमी प्रतिकारशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमायक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button