नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या 30 जागा आयडेंटिफाय केल्या आहेत. ए आणि बी अशी कॅटेगरी तयार करून सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली, कोअर कमिटीच्या आमच्या चार-पाच मीटिंग झाल्या आहेत. नवीन लोकांना नेमणूक देत लोकसभेची तयारी सुरू केली आहे. 17 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र दिले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पटोले (Nana Patole) म्हणाले, ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता होतो, ही सिस्टम आहे. आता दोन्ही सभागृहात काँग्रेसकडे जास्त आमदार आहेत. यासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा केली जाईल. लोकसभेच्या प्रचारासाठी पूर्ण राज्यात राज्यातील सहा विभागात किमान दोन- दोन सभा पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या घेण्याचे नियोजन सुरू आहे.
उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारणे हे खालच्या पातळीचं राजकारण आहे, काँग्रेस कधी असं करत नाही, असा महाराष्ट्र कधीच नव्हता. भाजपने असा महाराष्ट्र तयार केला आहे. सव्वा वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. एक मंत्री सहा- सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री असल्याने शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल, हा प्रश्न आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणाविषयी जनतेत संताप आहे. जे भाजपसोबत गेले ते कशासाठी गेले, हे जनतेला माहित आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत राहिलो. अजित पवार आमच्या सोबत कसे बाणा दाखवायचे, हे आम्हाला माहित आहे, मग ते आता का चूप आहेत.
हेही वाचा