

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : जनतेचे पैसे लुटून आपआपसांत भांडण करत बसायचे, अशी अली बाबा चाळीस चोरांची कहाणी आहे. आज शिंदे सरकारची पण महाराष्ट्रात तीच अवस्था आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी आम्ही राज्यपालांना निवेदन देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
ते (Nana Patole) पुढे म्हणाले की, 105 आमदार बीजेपीचे निवडून दिले, ही चूक झाली, असे आता जनतेला वाटत आहे. नुकताच एक सुलतानी जीआर महाराष्ट्र सरकारने काढला निवृत्त शिक्षकांना वीस हजाराच्या मानधनावर रिक्त पदी भरती करण्यात येईल. म्हणजे बेरोजगार तरुणांवर कुऱ्हाड चालवण्याचा हा प्रकार आहे. एकप्रकारे निवृत्तांना कामावर लावून तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे. दरम्यान, भाजपच्या भिवंडी येथील आजच्या बैठकीत मुंडे भगिनी अनुपस्थित असल्याबाबत छेडले असता तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत पटोले यांनी बोलणे टाळले.
मात्र, आज भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा म्हणजे त्यांच्या काय भावना आहेत, हे समजून येईल. भाजपचे नेते उद्या काँग्रेसमध्ये गेले, तर नवल नाही, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. हा त्यांचा सुचक इशारा होता. मी दावा करणार नाही, पण योग्य वेळी सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. राज्यात ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्यांची माहिती देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांविषयी आढावा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेलंगणात आता काँग्रेस सत्ता स्थापन करेल, असे चित्र आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान ही सगळी राज्ये आम्ही जिंकणार, असा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा