पुढारी ऑनलाईन डेस्क : के.एन. त्रिपाठी यांचा अर्ज बाद ठरल्याने आता काँग्रेस अध्यक्ष निवडणूक मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर यांच्यात होणार हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती काँग्रेस नेता आणि निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी दिली.
निवडणुकीसंदर्भात माहिती देताना मिस्त्री म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला एकूण २० अर्ज आले होते. आज आम्ही अर्जांची छाननी केली. २० पैकी चार अर्ज हे बाद झाले. आता पक्षाध्यक्ष निवडणूक ही मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर यांच्यात असेल. अर्ज माघारीची मूदत ही ८ ऑक्टोबर आहे, असेही त्यांनी सांगितले.
के. एन. त्रीपाठी यांचा अर्ज बाद का झाला, याबाबत माहिती देताना मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, त्यांच्या एका
अनुमोदकांच्या सहीमध्ये गोंधळ दिसला. तर दुसऱ्या अनुमोदकाची सही दोनवेळा झाली होती. के. एन.त्रिपाठी हे झारखंडमधील काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच ते माजी मंत्रीही आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता आठ ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारीची मूदत आहे. त्यामुळे खर्या अर्थाने आठ ऑक्टोबरनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आता दोन उमेदवारापैकी एकाने माघार घेतल्यास उर्वरीत उमेदवाराची बिनविरोध निवडणूक होणार आहे.
हेही वाचा :