काँग्रेस जनसंवाद यात्रा  
Latest

चंद्रपुरात आजपासून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरूवात

निलेश पोतदार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरात जनसंवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि चंद्रपूर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागात जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज रविवारी (३ सप्टेंबर) ला सकाळी 8 वाजता माता महाकाला मंदिर देवस्थान येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. या यात्रेचा समारोप १२ सप्टेंबरला होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे विविध पातळ्यांवरील अपयश जनतेसमोर आणण्यात येणार आहे. महाकाली मंदीराजवळून निघालेल्या यात्रेत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले व काँगेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने संविधानानुसार शासन न करता मनमर्जीनुसार सुरू केला आहे. मागील ९ वर्षांत देशाची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. जातीय दंगली घडविल्या जात आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असताना पंतप्रधान गप्प आहेत. राज्यात बेईमानी आणि ५० खोक्यातून तयार झालेल्या राज्य शासनाला जनतेशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, तरुण, महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांची क्रुर थट्टा चालविली जात आहे.

नोकरभरतीच्या नावावर बेरोजगार तरुणांकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळात ८ तास वीजही मिळत नाही. वीजेचे दर वाढवून जनतेची लूट केली जात आहे. सरकारी संस्था विकण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसींची जनगणना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चंद्रपुरातील बाबुपेठ उड्डाणपूल अर्धवटस्थितीत आहे. अमृत योजना पाच वर्षांनंतरही अपूर्ण आहे. जिल्ह्यात एकही नवीन उद्योग सुरू करण्यात आलेला नाही. यासह विविध प्रकारच्या समस्या पदयात्रे दरम्यान जनतेसमोर मांडण्यात येणार असल्‍याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT