पुढारी ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्र लिहित त्यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होत असतानाच राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्या बद्दल आपले अभिनंदन. वाटले होते की, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल, पण ते व्हायचे नव्हते असो…
पुढे राज ठाकरे या पत्रात लिहितात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम काम केले. आत्ताचे सरकार आणण्यासाठी अपार कष्ट केले. पक्षादेश शिरसावंद्या मानून उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतलीत. पक्षादेश हा कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले. तुमची ही कृती देशातील आणि राज्यातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
पत्राचा शेवट करताना राज यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ ही बढती आहे की अवनिती यात मी जात नाही. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावी लागते. हा मागे ओढलेल्या दोरीला कोणीही माघार म्हणत नाही. तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे, असा सल्लाही राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये दिला आहे.