छगन भुजबळ 
Latest

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीलाच पद मिळावे, नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भुजबळांचा दावा कायम

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा, नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने जोर लावल्यानंतर राज्यभरातील १२ पालकमंत्री बदलले गेले. मात्र नाशिकचे पालकमंत्रीपद शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडे कायम राहिल्याने या पदावर दावा सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संबधित बातम्या :

गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्रीपदावरून राज्याच्या सत्तेतील घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. विशेषत: अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर या संघर्षाला सुरूवात झाली. अजित पवार यांनी एकीकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असताना नाशिकमध्ये देखील भुजबळ यांनी पालकमंत्रीपदावर दावा सांगितला होता. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असावे, अशी भुजबळ यांची मागणी आहे. नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे मंत्रीपदावर बढती मिळाल्यानंतर पालकमंत्रीपद भुजबळ यांच्याकडे येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

राष्ट्रवादीच नव्हे तर भाजपनेही नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा केला होता. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रीपद मिळणार, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.४) राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांमध्ये फेरबदल जाहीर केले. परंतू नाशिकचे पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे कायम राहिले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून नाशिकमध्ये शिंदे गट व अजित पवार गटातील संघर्ष वाढला आहे.

भुजबळांचा दावा

नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडेच कायम राहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पालकमंत्रीपद मला मिळायला हवे यासाठी माझी इच्छा महत्त्वाची नाही, मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. हिरामण खोसकरदेखील आमचेच असल्यामुळे जिल्ह्यात सात आमदार आमचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीलाच पालकमंत्री पद मिळावे हा आमचा दावा कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT