Latest

Chhagan Bhujbal : ‘न पूछो मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर की शुरुवात की है; भुजबळांनी सुनावला शेर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर याआधी ५८ मोर्चे शांततेत निघाले, मग आता जाळपोळ कशाला असा सवाल करत एकत्र बसून हा प्रश्न सोडवा असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

'घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा' या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबिर शुक्रवारी पार पडले. त्यात ते बोलत होते. या शिबिराला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

१९९९ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ हाेता, असे सांगून मंत्री भुजबळ म्हणाले की, शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारासोबत जाऊन काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी महायुतीत सहभागी झालो. अडचणीचे प्रश्न एकत्र बसून सोडवत आहोत. न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. यामध्ये आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करायचे आहे. जास्तीत-जास्त आमदार निवडून आणायचे तरच आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व घटकांना सोबत घ्यावे लागणार आहे. ओबीसी जनगणना व्हावी ही मागणी केली आहे. एक राज्य करते तर सर्वच राज्यांनीही केली पाहिजे. प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. आपल्याला जुन्या मित्रांसोबत आता लढाई करावी लागत आहे असे सांगतानाच 'न पूछो मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर की शुरुवात की है …' हा शेर ऐकवत त्यांनी भाषणाची सांगता केली.

हेेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT