सांगली : राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत टाकल्या उड्या | पुढारी

सांगली : राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत टाकल्या उड्या

इस्लामपूर;  पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील राजारामबापू साखर कारखान्यात काटा बंद आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकल्या. कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. यामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले. वातावरण तणावपूर्ण बनल्याने आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

उसाला पहिली उचल एफआरपी अधिक शंभर रुपये व कोल्हापूर जिल्ह्यात ठरल्याप्रमाणे गतवर्षीचा दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजारामबापू साखर कारखान्यावर काटा बंद आंदोलन जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. अकरा वाजल्यापासून संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ज्या गेटमधून ऊस कारखान्यात जातो, तेथेच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.

बैठकीत तोडगा नाही

दुपारी सव्वाबारा वाजता राजू शेट्टी यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी, कारखान्याने तुमची मागणी मान्य केली आहे, तसे ते लेखी पत्र देण्यास तयार आहेत, त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्या, अशी विनंती शेट्टी यांना केली. तसेच लेखी पत्र घेण्यासाठी शेट्टी यांना कारखान्याच्या कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, संचालक व शेट्टी यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत कार्यकारी संचालक माहुली यांनी, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यापूर्वीच 3100 रुपये दर जाहीर केला आहे. यामध्ये काही बदल होणार नाही, अशी भूमिका मांडली.

शेट्टी यांनी, तुमच्या कारखान्याची एफआरपीच 3210 रुपये होतेय. ती एकरकमी द्यावी व अधिक 100 रुपये जाहीर करावेत, तरच आंदोलन मागे घेतो, असे स्पष्ट केले. मात्र या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेट्टी कार्यकर्त्यांसमवेत कारखान्याच्या गेटवर ठिय्या मांडून बसले. दिवसभर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तोडगा निघेपर्यंत येथेच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. आंदोलनस्थळी मंडप उभारण्यात आला. तसेच जेवणाचीही व्यवस्था केली होती.

अन् गाळप थांबविले

कारखान्यात येणारी वाहने कार्यकर्ते आत सोडत नव्हते. त्यामुळे दुसर्‍या गेटमधून वाहने आत नेण्यात येऊ लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच उसाचे ट्रॅक्टर अडविले. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी ऊस अपुरा पडू लागल्याने कारखान्याचे गाळपच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

कारखाना समर्थकही जमा

कारखान्यावर आंदोलन सुरू असल्याचे तालुक्यात समजले. त्यामुळे संचालकांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कारखाना कार्यस्थळावर दाखल होऊ लागले. त्यामुळे एका बाजूला स्वाभिमानीचे कार्यकर्ते, तर दुसरीकडे कारखाना समर्थक असे चित्र होते.

लेखी हमीशिवाय माघार नाही

दरावर तोडगा काढण्यासाठी कारखान्यांना काही वेळ द्यावा. जिल्हाधिकारीही लवकरच कारखानदारांची बैठक घेण्यास तयार आहेत. त्यांनी तसा निरोप दिला आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी शेट्टी यांना केली. त्यावेळी शेट्टी यांनी, आम्ही दोन पावले मागे घ्यायला तयार आहे. दोन दिवसात दरावर तोडगा काढतो, असे लेखी पत्र आम्हाला द्यावे. नाही तर कारखानदारांची बैठक कधी घेणार त्याची तारीख जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करावी, मग आंदोेलन मागे घेतो, असे सांगितले. मात्र कोणाचेच लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरूच राहिले.

‘तो’ नियम लागू होत नाही का?

संघटनेचे पदाधिकारी व कारखाना प्रशासन यांच्यात बैठक झाली. यावेळी कार्यकारी संचालक माहुली यांनी, शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही आजपर्यंत दर दिला आहे, नियम मोडून आम्ही काही करणार नाही, असे बैठकीत सांगितले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, मग नियमाप्रमाणे 14 दिवसांच्या आत कारखाने एफआरपी का देत नाहीत? तो नियम कारखान्यांना लागू होत नाही का? असा सवाल केला.
दरम्यान, पोलिसांचे लक्ष चुकवून स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीप राजोबा, भागवत जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारल्या. यावेळी पोलिसांची एकच धावपळ उडाली. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, अ‍ॅड. एस. यु. संदे, बाबासाहेब सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, संतोष शेळके, अनिल काळे, प्रभाकर पाटील, रवींद्र दुकाने, भूषण वाकळे, वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.

आ. जयंत पाटील यांनी राज्यभर जनआक्रोश यात्रा काढून शेतकर्‍यांबद्दल खोटा कळवळा दाखविण्यापेक्षा तालुक्यातील शेतकर्‍यांना आधी न्याय द्यावा, अशी मागणी खा. शेट्टी यांनी यावेळी केली. ते म्हणाले, गेले दोन महिने जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर आहेत. मात्र आ. जयंत पाटील यांनी याबद्दल शब्दही काढलेला नाही. आ. पाटील यांनी आपण फक्त कारखानदार आहे हे विसरून, एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत हे विसरू नये, असा टोलाही खा. शेट्टी यांनी लगावला. जयंत पाटील हेच इतर कारखान्यांना जादा दर देऊ देत नाहीत, असे अनेक कारखानदारांनी मला सांगितले. त्यामुळे त्यांच्याच कारखान्यावर पहिले आंदोलन करीत आहे. नंतर अन्य कारखान्यांवरही आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

7 डिसेंबरला बैठक; आंदोलन स्थगित
जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची 7 डिसेंबर रोजी बैठक घेऊन ऊस दरावर तोडगा काढू, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने रात्री उशिरा स्वाभिमानीने आंदोलन स्थगित केले. 7 तारखेच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास 10 डिसेंबरला पुन्हा पुणे-बंगळूर महामार्गावर ठिय्या मांडण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Back to top button