चेन्नई; वृत्तसंस्था : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा तब्बल 78 धावांनी दारूण पराभव केला. हैदराबादला सलग दुसर्या पराभवाचा सामना करावा लागला. आधी ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेची झंझावाती फलंदाजी आणि नंतर तुषार देशपांडेची घातक गोलंदाजी या मराठी माणसांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नईने दोन गुण मिळवले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराज गायकवाड (98) आणि शिवम दुबे (39) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबाद संघाला 213 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदरबाद संघ 134 धावांवरच गारद झाला. तुषार देशपांडेने 27 धावांत 4 विकेट घेतल्या.
द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. चेन्नईच्या गोलंदाजांनी होम ग्राऊंडवर टिच्चून आणि योजनाबद्ध मारा केला. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये तीनवेळा अडीचशे पार जाणारे हैदराबादी खेळाडू चेपॉकच्या गरमीतही थंडगार पडले. त्यांना दीडशेपारही जाता आले नाही. त्यांच्याकडून एडन मार्कराम (32) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
तत्पूर्वी, पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईला अजिंक्य रहाणेच्या (9) रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर ऋतुराज आणि डॅरिल यांनी मोर्चा सांभाळत मोठी भागीदारी नोंदवली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी केली, त्याचे थोडक्यात शतक हुकले. ऋतुराजने 98 धावा करून हैदराबादसमोर 213 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. ऋतुराजने 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 54 चेंडूंत 98 धावांची खेळी केली. त्याला डॅरिल मिशेलने चांगली साथ देत 52 धावा कुटल्या. मग शिवम दुबेने 20 चेंडूंत 39 धावांची स्फोटक खेळी केली. नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनीने फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याला 2 चेंडूंत 5 धावा करता आल्या. अखेर चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 212 धावा करून हैदराबादला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी 1-1 बळी घेता आला.
हेही वाचा :