पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरा बोर्ड आणि विद्यापीठे ऑनलाईन स्थापन करून त्या माध्यमातून तब्बल 2 हजार 739 विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे 35 ते 80 हजार रूपयांपर्यंत वाटल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह आठ जणांविरोधात 370 पानांचे आरोपपत्र दाखल केले.
सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (वय-38, रा. संभाजीनगर), संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. दुधारी, सांगली), अलताब अब्दुल शेख (29, मु. पो. कुंभेफळ, उस्मानाबाद), कृष्णा सोनाजी गिरी (39, रा. कृष्णापुर, बीडकीन, ता. पैठण, संभाजीनगर), जमाल अजगर शेख (36, रा. पांंजरपोळ, मुंबई), महेश उर्फ मुनीब दयाशंकर विश्वकर्मा (35, चांदीवली, मुंबई), संदीपकुमार शमलाशंकर गुप्ता (33, रा. हनुमारनगर, खाडी, कुर्ला वेस्ट) आणि जगदीश रमेश पाठक (33, रा. भौणेश्वर, रोहा, रायगड) अशी अरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सय्यद इम्रान या मुख्य आरोपीने 2019 ला 'महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल' (एमएसओएस) हे नावात बदल करुन गुगलवर स्वत:ची बेकायदेशीर वेबसाईट सुरु केली. सदर ओपन स्कुलला फी आकरण्याचा किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नसताना, आरोपीने स्वयंसेवी संस्थाची मान्यता घेत परस्पर विद्यार्थ्यांना फी आकरण्यासोबत परीक्षा घेण्याचे आश्वासन देत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले. त्या आधारे त्याने हजारो विद्यार्थ्यांकडून 35 हजार ते 80 हजारांपर्यंत मोठ्या रकमा स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो केवळ दहावीची प्रमाणपत्र देण्यावरच थांबला नाही.
अकरा बोर्ड, विद्यापीठांच्या नावाने वाटली प्रमाणपत्रे
त्याने एजेवाज युनीव्हरसिटी, एजेवाज विद्यापीठ, अॅमडस विद्यापीठ, अॅमडस युनिव्हर्सीटी, एमबीटीईई बोर्ड, एमएसओएस (महाराष्ट्र स्टेट ऑफ ओपन स्कुल), महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल, एमआरएमव्ही (महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ), एएसओएस युनिव्हरसिटी, बीएसईएम (बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा) आणि बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा अशी ऑनलाईन विद्यापीठे आणि बोर्ड स्थापन केली.
अशा प्रकारची पैसे घेऊन वाटली प्रमाणपत्रे :
त्याने तब्बल 2 हजार 739 दहावी, बारावी, बीएससी, बीकॉम, बीए, डिप्लोमा आयटीआय, इंजिनिअरिंग,़ नर्सींगची प्रमाणपत्रे पैसे घेऊन वाटल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलिस नाईक गजानन सोलवनकर, पोलिस शिपाई राहुल होळकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सायबर तज्ज्ञ कपील जैन यांनी सर्व तांत्रिक तपासासाठी महत्वाची कामगिरी बजावली. आरोपपत्रात 70 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यात तपास अद्याप सुरू असून काहीजण यामध्ये फरार देखील आहे. त्या अनुषंगाने पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
ज्यांनी संबंधीत अकरा विद्यापीठ, बोर्ड यांची प्रमाणपत्रे घेतली आहेत. त्यांनी ती प्रमाणपत्रे पुणे पोलिसांकडे जमा करावी. प्रमाणपत्राच्या आधारे जे नोकरीस लागले आहेत अशा संस्थानी, कंपन्यांनी याची माहिती पुरवण्याचे अवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तसेच न केल्यास भविष्यात अशी प्रमाणपत्रे आढळल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– नारायण शिरगांवकर, सहायक पोलिस आयुक्त.
हे ही वाचा :