सिंधुदुर्गात दमदार पाऊस! सावडाव धबधबा प्रवाहित

सिंधुदुर्गात दमदार पाऊस! सावडाव धबधबा प्रवाहित
Published on
Updated on

नांदगाव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह परराज्यातील वर्षा पर्यटकांच्या पसंतीस उतरेलला निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने हा धबधबा कोसळण्यास सुरुवात झाली. यामुळे येथील वर्षा पर्यटन सुरू होणार आहे.

यावर्षी मान्सून उशिरा सक्रिय झाला, तरी सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणार्‍या पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. हिरवी गर्द झाडी व निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा हा धबधबा कुटुंबवत्सल पर्यटकांची विशेष पसंती आहे. वर्षा पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित धबधबा म्हणून सावडाव धबधबा ओळखला जातो. आंबोलीनंतर याच धबधब्यावर वर्षा पर्यटकांची सवार्ंत जास्त गर्दी असते. सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली,पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा व इतर भागांतील वर्षा पर्यटक मोठ्या संख्येने सावडाव धबधब्याला पसंती देतात. डोंगर पठारावरून, पसरट कड्यावरून खाली कोसळणार्‍या या धबधब्याखाली अत्यंत सुरक्षितपणे स्नानाचा आनंद लुटता येतो. जून ते सप्टेंबर या काळात पूर्ण क्षमतेने वाहणार्‍या या धबधब्यावर रविवार व सुट्टीच्या दिवशी वर्षा पर्यटकांची विक्रमी गर्दी होत असते.

या ठिकाणी पर्यटकांसाठी ग्रामपंचायतीने रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता गृह, महिलांसाठी चेंजिंग रूम व सुसज्ज रस्ता अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकरांसह अन्य नेतेमंडळी, शासकीय अधिकार्‍यांनी या धबधब्याची पाहणी करत सावडाव धबधबा परिसर नियोजन केले होते. मात्र, ही फक्त घोषणाच राहिली असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

या ठिकाणी सध्या लोखंडी रॅम्प,पायर्‍या, सुशोभिकरण, बाथरूम, टॉयलेट, रस्ता अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या धबधब्यामुळे स्थानिकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, या ठिकाणी दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढती असून उपलब्ध सोयी अपुर्‍या पडत आहेत. तसेच वर्षा पर्यटन हंगाम संपेपर्यंत या ठिकाणी दररोज पोलिस कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहेत. सावडाव धबधबा ठिकाणी सर्व पर्यटकांनी शांततेत आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच आर्या वारंग व उपसरंच दत्ता काटे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news