Latest

जळगाववरुन बदलले राजकीय वारे; विद्यमानांमध्ये अस्वस्थता

अंजली राऊत

जळगाव : नरेंद्र पाटील 

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्ह्याला महत्वाचे स्थान आहे. जळगाव जिल्हा नेहमीच एक आगळी वेगळी भूमिका निभवताना दिसून आलेला आहे. एकेकाळी ज्या जळगाव जिल्ह्यावर काँग्रेसच्या बालेकिल्लाची मोहोर लागलेली होती. आज मात्र त्याच ठिकाणी लोकसभा निवडणुकीत गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून भाजपाचा झेंडा डौलाने फडकत असताना दिसून येत आहे. या झेंड्याखाली काँग्रेसचे माजी खासदार व त्यांची कन्या आल्यामुळे रावेर लोकसभेचे चित्र व उमेदवार बदलण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दुसरीकडे जळगाव लोकसभेमध्ये पुन्हा नवीन चेहरा देऊन जळगाव लोकसभेला धक्का भाजपाकडून देण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांमध्ये जरी काही अस्वस्थता दिसत नसली, तरी सर्वांच्या डोक्यावर टांगती तलवार मात्र आहे हे नक्की!

काँग्रेसचे प्रमुख दावेदार असलेले उमेदवार भाजपात गेल्यामुळे रावेर लोकसभा ही राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे दिसू लागलेली आहे. त्यामुळे खडसे खासदारकीच्या मैदानात उतरणार का या चर्चेला देखील उधाण आले आहे. जळगाव जिल्हा हा काँग्रेसच्या कारकिर्दीपासूनच चर्चेत राहिलेला एक जिल्हा आहे. काँग्रेस आय असो, काँग्रेस ई असो, त्यानंतर शिवसेना असो की भाजपा असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो यांनी आपापले वर्चस्व जळगाव जिल्ह्यावर काही काळापुरते का होईना प्रस्थापित केलेले आहे. त्यामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर भाजपाचा झेंडा फडकलेला आहे. गेल्या निवडणुकीत जळगाव लोकसभेमध्ये झालेल्या उमेदवार बदलामुळे अनेकांना जबरदस्त धक्का बसला होता. दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना जाहीर झालेले तिकिट मतदानाच्या पंधरा दिवसांपूर्वीच बदलण्यात येऊन उन्मेश पाटील यांना जळगाव लोकसभेची संधी देण्यात आली. त्यानंतर रावेर लोकसभेमध्ये उमेदवार बदलण्याची चर्चेला रक्षा खडसे यांना तिकीट देऊन ती थांबवण्यात आली होती. यावर्षी जळगाव लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार नवीन असणार या चर्चेमुळे सर्वांचे लक्ष उमेदवारांकडे लागलेले आहेत.

काँग्रेसचे निष्ठावंत असलेले डॉ. उल्हास पाटील व कन्या डॉ. केतकी पाटील यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही दिवस पूर्वीच भाजपात प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात विशेष म्हटले तर डॉ. केतकी यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून रावेर लोकसभेच्या ग्रामीण भागात अंतोदय व ग्राम संपर्क अभियानातून व भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यातून त्यांनी काही संकेतच दिलेले आहेत की, त्या भविष्यात रावेर लोकसभेच्या प्रमुख दावेदार असू शकतात. एकीकडे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सासरे राष्ट्रवादीत, सून भाजपात यामुळे व त्यात मुख्य भर म्हणजे गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वैर हे जगजाहीर आहे.

खडसे यांनी रावेर लोकसभा राष्ट्रवादीत आल्यानंतर किंवा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण उमेदवारी करू असे जाहीर केलेले आहे. त्यात एकमेव काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेले उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे भाजपात गेल्यामुळे काँग्रेसकडे दमदार असा व भाजपाला आवाहन देईल असा उमेदवारच आता नसल्याने रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी रावेर लोकसभेतून खडसे हे उमेदवारी करू शकतात. आता रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा व सून यांच्यात सामना होऊ शकतो. जर भाजपाने रक्षा खडसे यांचे तिकीट कापले तर एकनाथ खडसे विरुद्ध संभाव्य उमेदवार डॉ. केतकी पाटील, अमोल जावळे यांच्यात लढत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमोल जावडे हे जे रक्षा खडसे यानंतर पहिले प्रबळ दावेदार होते हे आता डॉ. केतकी पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे दोन नंबरच्या क्रमांकाला गेलेले आहेत. यापूर्वीच त्यांच्यावर रावेर लोकसभा मतदारसंघाची जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आलेली आहेत. या राजकीय मंथनातून असे संकेत मिळत आहेत की, डॉ. केतकी व डॉ. उल्हास पाटील यांचा भाजपातील प्रवेश पूर्व नियोजित होता, जो निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेली उमेदवार बदलीच्या चर्चेला पूर्णोक्ती मिळाली आहे. या बदलत्या राजकारणामुळे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष रावेर लोकसभाकडे लागलेले  आहे.

डॉ. केतकी व उल्हास पाटील भाजपात आल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते काम करणार का ? हा एक प्रश्न आहे की पुन्हा मोदी यांची जादू चालवण्यासाठी मोदीजींना जिल्ह्यात यावे लागणार आहे. कारण रावेर लोकसभा मतदारसंघ हा या बदलामुळे किंवा या बदलांच्या वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत असल्याने येथेही बदल घडवेल का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. रावेर लोकसभा व जळगाव लोकसभेचे उमेदवार जर बदलले तर नामदार गिरीश महाजन यांना भरपूर कस लावावा लागणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण व आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेला बंड जो की त्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये व मुख्यतः जळगाव लोकसभेमध्ये शिवसेनेच्या दबदबा असताना व विरोधातही शिवसेना असताना भाजपाच्या उमेदवारांना शिंदे गट किती प्रमाणात साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नेहमी तडजोडीचे राजकारण करणारे गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्यातील लोकसभेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार नाही तर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागणार आहे. एकेकाळी खडसे यांच्या बरोबर असलेले गिरीश महाजन आज त्यांच्या विरोधात असल्याने विरोधातील पक्ष संघटना व त्यांची ताकद व दुसरीकडे एकनाथ खडसे व त्यांचा राजकीय अनुभव यामुळे गिरीश महाजन यांना लोकसभा निवडणुकीत कस लागणार आहे, हे मात्र नक्की.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT