समंजसपणा दाखवा, आंदोलन मागे घ्या; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन | पुढारी

समंजसपणा दाखवा, आंदोलन मागे घ्या; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : आमचे सरकार हे जनतेचे सरकार आहे. सव्वा लाख लोक सुट्ट्या न घेता रात्रंदिवस मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षणाचे काम करत आहेत. मराठा समाजाने आता सहकार्य केले पाहिजे. जरांगे यांनी समंजसपणा दाखवून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातून केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तेश्वर यात्रेनिमित्त दोन दिवसांच्या मुक्कामी दौर्‍यावर आहेत. त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे ते आले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना जरांगे यांच्या आंदोलनाबाबत थेट प्रश्न विचारले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचीदेखील आम्ही काळजी घेणार आहोत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येताच आम्ही मराठ्यांना टिकणारे कायमस्वरूपी आरक्षण देणार आहोत. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज मागास कसा आहे, हे सिद्ध करण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्या दूर करण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर विशेष अधिवेशन होईल. त्यामध्ये मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी. सरकार आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आहे, तसेच आरक्षण देणार आहे याचा विचार करून त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना केले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भगवी वस्त्रे पांघरून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून कोणी बाळासाहेब ठाकरे होत नाही. त्यांचे विचार आत्मसात करावे लागतात, तसे वागावे लागते. बाळासाहेबांचे विचार यांनी बाजूला ठेवून मोदींना नावे ठेवणार्‍या काँग्रेसपुढे सत्तेसाठी लोटांगण घातले. वाघाचे कातडे पांघरल्याने लांडगा कधी वाघ होत नाही. जे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, त्यांनी सत्तेत आल्यानंतर खिचडी घोटाळा केला, त्यांनी कोरोनात बॅग घोटाळा केला त्यांना कफन चोर म्हणायचे का? अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, घरी बसलेल्यांना लोक सत्तेत आणतात का? आज आम्ही दिवस-रात्र काम करतोय. सरकारला केंद्राचेही पाठबळ आहे. भूमिपूजन आणि उद्घाटनही एकाच व्यक्तीकडून होत आहे. नियती व नीतिमत्ता साफ असल्यानेच हे होत आहे. त्याचीच पोटदुखी त्यांना आहे. ट्रिपल इंजिन सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत असल्याचा त्यांना पोटशूळ आहे. विकास व हिंदुत्व हा आमचा अजेंडा आहे. दावोसमध्ये साडेतीन लाख कोटींचे एमओयू साईन झाले आहेत. यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोक कोणाला मतदान करतील, घरी बसलेल्यांना की काम करणार्‍यांना? अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, शेतकर्‍याचा मुलगा असल्याने मी गावी आल्यावर माझी शेतीकडे नाळ जोडली जाते. त्यामुळे मी शेतामध्ये जाऊन कामे करतो. सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाला वाव आहे. या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Back to top button