Chandrakant Patil: Our activists showed strength in Pune 
Latest

चंद्रकांत पाटील : पुण्यात आमच्या कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून दिली 

backup backup

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांचे कौतुक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मात्र, आम्ही ते सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात पुण्यातील कार्यकर्त्यांनी आम्ही पण काही कमी नाही, हे दाखवून दिले आहे.

हम किसीको टोकते नही, किसीने टोका तो उसे छोडते नही, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गजानन चिंचवडे मृत्यू प्रकरणात पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी- चिंचवड प्राधिकरण समितीचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक बाबू नायर, चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे ५ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. जमीन प्रकरणात चिंचवडे यांच्यावर मृत्यूपूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या दबावामुळेच चिंचवडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाने केला.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेत पाटील यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तेचा दुरुपयोग आम्ही सहन करणार नाही. पुण्यात कार्यकर्त्यांनी आम्ही पण कमी नसल्याचे दाखवून दिले.

खोट्या केसेस करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तरीही महापालिका निवडणुकीत हे दमणचक्र चालणार नाही. प्रामुख्याने मी आता गजानन चिंचवडे यांचा विषय लावून धरणार आहे.

मी महसून मंत्री होतो त्यामुळे मला कायदा कळतो. गजानन चिंचवड यांच्या विरोधातील तक्रार दिवाणी बाब म्हणून पोलिसांनी फेकून द्यायला हवी होती. मात्र, पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत".

१० मार्च नंतर सरकार पडणार

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा प्रकरणात मोठमोठी नावे समोर येत आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फ़त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बदली घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना लवरकरच तुरुंगात जावे लागणार आहे. त्यामुळे लहान मुलगाही हे सरकार टिकणार नाही, असे सहजपणे सांगू शकेल. मी तर राजकारणात आहे. त्यामुळे वारंवार सांगतोय की, १० मार्च नंतर हे सरकार टिकणार नाही.

गोमूत्राच्या वापरामुळे मला आनंद

पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाल्यानंतर कार्यकर्त्यानी त्याच ठिकाणी सोमय्या यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर काँग्रेसने गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केले. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला सगळ्यात जास्त आनंद याचा झाला की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गायीवरचा विश्वास वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT