पुढारी ऑनलाईन डेस्क
मी संत नाही; पण मला गर्व आहे की, मी पैसे कमविण्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत, अशा शब्दात उद्योगपती राहुल बजाज यांनी आपल्या कारकीर्दीचे वर्णन विख्यात मासिक फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले होते. नैतिकता आणि उद्योग यांचे संस्कार नवीन पिढीला देणारे उद्योगपती राहुल बजाज यांचे प्रदीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले.
शाळेत बॉक्सर… 'हार्वर्ड'मध्ये एमबीए…
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी झाला. वडील कमलनय बजाज आणि आई सावित्री यांनी मुलाचे नाव राहुल ठेवलं. त्याचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये झालं. शाळेत असताना राहुल बजाज हे
बॉक्सिंग चॅम्पियन होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सेंट स्टीफंस कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये त्यांनी मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ( एमबीए ) पदवी घेतली. १९६५मध्ये राहुल बजाज भारतात परतले. १९६८ मध्ये राहुल बजाज हे बजाज ऑटोचे सीईओ झाले.
देशात स्वातंत्र्यानंतर एखाद्या खासगी उद्योगाला अनेक परवानगींना सामोरे जावे लागायचे. साधी सुईची निर्मितीसाठी तब्बल ८०हून अधिक परवानग्या घ्यावा लागत असत. तसेच खासगी उद्योगांच्या उत्पादनावरही सरकारचे नियंत्रण होते. खासगी कंपन्याच्या उत्पादनाचा निर्णय हा सरकार घेत असे. याच काळात राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समुहाची जबाबदारी आपल्या खाद्यांवर घेतली.
देशातील सर्वसामान्यांना बजाज या नावाची ओळख ही स्कुटरमुळे झाली. बजाजची स्कुटर हा शहरातील मध्यमवर्गाचे वाहन ठरलं. घरात बजाजची स्कुटर असणे ही त्या काळातील मध्यम वर्गाची ओळख बनली. मात्र स्कुटरच्या उत्पादनावर सरकारचे नियंत्रण होते. त्यामुळे बजाज स्कुटरचे उत्पादन अधिक करु शकत नव्हते. याच काळात बजाज स्कुटरच्या खरेदीसाठी नोंदणी करावी लागत होती. विशेष म्हणजे, या नोंदणीवर स्कुटर ग्राहकला मिळण्याची तारीख ही पुढील दहा वर्षांची असायची. त्यामुळे बजाजची स्कुटर घेण्यासाठी ग्राहक अधिक रक्कम देण्यासही तयार असत.
१९९१मध्ये भारताने आर्थिक उदारणीकरणाचे धोरण स्वीकारले. उद्योग जगतामध्ये जागतिक स्पर्धा सुरु झाली. लायसन्स राज संपलं. भारताचे दरवाजे विदेशी कंपन्यांनाही खुले झाले. विदेशी कंपन्यांशी आता भारतीय कंपन्यांना स्पर्धा करायची होती. राहुल बजाज यांनी स्वदेशी कंपन्यांना समान संधी देण्याचा आग्रह केला. उदारीकरणाचा मी विरोध करत नाही; पण स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय कंपन्यांना समान संधी मिळण्याचा माझा आग्रह होता, असे एका मुलाखतीमध्ये राहुल बजाज यांनी स्पष्ट केले होते.
ज्येष्ठ गांधीवादी जमनालाल बजाज हे राहुल बजाज यांचे आजोबा. जमनालाल बजाज हे बजाज समूहाचे संस्थापक होते.महात्मा गांधी हे जमनालाल यांनी आपले मानस पुत्र मानत. त्यांच्या महात्मा गांधी यांच्या विचाराचा मोठा प्रभाव होता. १९२१ मध्ये वर्धा येथील आश्रमच्या स्थापनेसाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. ते स्वातंत्र्य लढ्यात ते सक्रीय होते. अनेकवेळा त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. राहुल बजाज यांच्या विचारावर त्यांच्या आजोबांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी आपण कधीच चुकीचे मार्गाने पैसे कमवले नाहीत, असे एका फोर्ब्स दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
राहुल बजाज यांनी बजाज उत्पादनाच्या जाहीरात करतानाही 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज' अशीच केली. या जाहीरातीने बजाज समूहाच्या लोकप्रियतेला नव्या उंचीवर नेले. बजाज उद्योग समुहाला नवी ओळख देण्याबरोबर एक भारतीय उद्योजक म्हणून राहुल बजाज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची निर्माण केलेली ओळख ही भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.