पुणे : पुढारी वृत्तसेवा
ईडीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना पदावर रहाण्याचा काेणता नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भाजपला रस्त्यावर उतरुन आंदाेलन करावे लागेल अशी मागणी वजा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
पाटील म्हणाले, प्रत्येक गाेष्ट आंदाेलन केल्याशिवाय हे सरकार ऐकत नाही हे अनिल देशमुख प्रकरणातही समाेर आले आहे. ज्या ज्या मंत्र्यावर आराेप हाेऊन त्यांना अटक हाेईल, त्यांना राजीनामा द्यावा लागेल ही राज्याची परंपरा आहे. या सरकारने कुठे कुठे घटना पायदळी तुडवली याबाबत मी २२ पानी नाेट लिहली असल्याचे ते म्हणाले.
त्याबरोबरच आता कशाची वाट पाहताय म्हणत, पूजा आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यालाही राजीनामा द्यावा लागल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखही सध्या मनी लॉनड्रिंग प्रकरणात कारागृहात आहे. एका मंत्र्यांने दोन लग्न करूनही तो मंत्री पदावर असून महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले.