Latest

’मिशन ऑलिम्पिक’साठी केंद्रीय शिक्षण मंडळाची ’आस’

अमृता चौगुले
पुणे : ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकवत पदकांची लयलूट करावी, अशी अपेक्षा सर्वच व्यक्त करतात. मात्र, या खेळांची पायाभरणी करणार्‍या शालेय जीवनातच खेळाडूंना मैदाने उपलब्ध होत नाहीत. यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या ध्येयधोरणांची राज्य सरकारने अंमलबजावणी करीत रोज 'एक तास एका खेळासाठी' हा निर्णय राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने घेणे  गरजेचे आहे. राज्यात क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करताना ठरावीक वयोगटातील खेळाडूंचा अधिक विचार केला जातो. मात्र, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबतचे वातावरण निर्माण झाले, तर राज्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रगती वेगळी असेल.
राज्यात बीपीएड झालेले विद्यार्थी नोकरीविना बेरोजगार आहेत, तर इतर राज्यात बीपीएड झालेल्या विद्यार्थ्याला त्वरित क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीमध्ये सामावून घेतले जाते.  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी माजी सैनिक हे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत राहतील, असा निर्णय घेतला. या निर्णयावरून अनेक वादंग निर्माणही झाले. शासनाची अनेक क्रीडा संकुले धूळखात पडून असून, काही संकुलांवर राजकीय व्यक्तींचे वर्चस्व आहे. शासनाने याच क्रीडा संकुलामध्ये क्रीडा शिक्षण हा प्रकल्प राबविला तर नक्कीच चांगले खेळाडू घडतील.
राज्यात कोणत्याही शाळांना परवानगी देताना मैदानांचा विचार केला जात आहे. शालेय शिक्षण धोरणामध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडाला फारसे महत्त्वच दिलेले नाही. त्यामुळे अनेक शाळांना मैदानेच नसल्याने विद्यार्थी कोणत्या मैदानावर खेळणार आहेत आणि त्यांच्यामध्ये खेळांचे वातावरण कसे निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर प्रत्येक तालुका आणि जिल्हापातळीवर क्रीडा शाळा सुरू कराव्यात. वयाच्या दहाव्या वर्षापासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना तेथे शिक्षणाबरोबरच खेळांचेही अत्याधुनिक प्रशिक्षण दिल्यास नक्कीच ऑलिम्पिक पदकांची आपण अपेक्षा ठेवू शकतो.
– मनोज देवळेकर, क्रीडा प्रशिक्षक अ‍ॅथलेटिक्स
केंद्र पातळीवर शिक्षण मंडळाची स्वतंत्र प्रणाली आणि नियमावली अस्तित्वात आहे. या नियमावलीच्या धर्तीवर सरकारने प्रत्येक दिवशी एक तास एका खेळासाठी देणे बंधनकारक करावे. तसेच ज्या ठिकाणी शाळा तेथे क्रीडा शिक्षक अनिवार्य असा अध्यादेश काढल्यास नक्कीच तळागाळातील दडलेले खेळाडू राज्याला मिळतील. राज्य क्रीडा क्षेत्रातही आणखी जास्त प्रगती करू शकेल.
– शिवदत्त ढवळे, सहसचिव, 
राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ
राज्यात पुणे, मुंबई, यवतमाळ, बीड, बार्शी, अमरावती आदी ठिकाणी बीपीएड महाविद्यालये कार्यरत आहेत. प्रत्येक महाविद्यालयाला 100 जागा दिलेल्या असतात. पुणे, मुंबई आणि अमरावती येथे महाविद्यालयांमध्ये बीपीएडसाठी जागा भरलेल्या असतात. मात्र, इतर ठिकाणी जागा शिल्लक राहत आहेत ही वस्तुस्थिती आहे. दुसर्‍या बाजूला राज्य शासनाच्या नव्या निर्णयाने पहिली ते दहावीपर्यंत क्रीडा शिक्षकांची भरती केली जाणार नाही. असा निर्णय असेल तर बीपीएडचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होणार आहे. याबाबत विचार झालेला नाही. त्यामुळे बीपीएड झालेल्या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक म्हणून संधी मिळणे गरजेचे आहे.
– शिरीष मोरे, सहायक प्राध्यापक, आगाशे महाविद्यालय
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT