

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जी-20 शिखर परिषदेसाठी 20 राष्ट्रप्रमुखांसह हजारो मंत्री, अधिकारी राजधानी दिल्लीत येणार असल्याने 8 ते 10 सप्टेंबर या काळातील पाहुणचारासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. विमानतळांचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी 160 फ्लाईटस् रद्द करण्यात आल्या आहेत. पाहुण्यांच्या प्रवासासाठी लक्झरी वाहनांची बेगमी करण्यात आली आहे; तर राजधानीच्या रस्त्यांवर पावणेसात लाख फूलझाडांच्या कुंड्या व पुष्पकमानींनी सजावट करण्यात येत आहे.
8 ते 10 सप्टेंबर हे तीन दिवस विमानसेवेची कसोटी पाहणारे आहेत. जी-20 च्या सहभागी देशांच्या प्रमुखांना व प्रतिनिधी मंडळांना घेऊन येणारी विमाने दिल्ली विमानतळावर येणार असल्याने विमानतळ प्राधिकरणाने विमानसेवेचे फेरनियोजन केले असून, देशांतर्गत 160 विमान उड्डाणे रद्द केली आहेत. जी-20 शिखर परिषद जरी 9 आणि 10 तारखेला होणार असली तरी अनेक देशांचे प्रतिनिधी मंडळ एक दिवस आधीच येणार आहेत. त्यामुळे या विमानांना सामावून घेण्यासाठी विमानतळ
व्यवस्थापन सज्ज आहे. विमानतळावर पुरेशी पार्किंग जागा उपलब्ध असून विविध देशांची विमाने तेथे थांबतील, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. याशिवाय त्या काळात इतर विमानांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणले गेले असून काही विमान कंपन्यांना त्यांचे वेळापत्रक तीन दिवसांसाठी बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय ताफाही सज्ज
जी-20 च्या काळात वैद्यकीय सेवेसाठी 130 अॅम्ब्युलन्स आणि 80 डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यातील डॉक्टरांच्या तीन टीम करून त्यांना रुग्णालयांकडून उपचारांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकांसोबत असणार्या 130 अॅम्ब्युलन्सपैकी 70 अॅम्ब्युलन्स अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेने सुसज्ज असतील तर उर्वरित 60 अॅम्ब्युलन्समध्ये तातडीचे सर्व उपचार जागच्या जागी मिळण्याची सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. तसेच या वाहनांत आणि डॉक्टरांकडे सर्व मेडिकल किट देण्यात आली आहेत.
66 अग्निशमन बंब, पथके तैनात
या बैठकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून अग्निशमन दलांचे 66 बंब तयार ठेवण्यात आले आहेत. परिषदेच्या ठिकाणी पाच बंब तैनात केले जाणार असून पाहुणे मंडळी उतरणार असणार्या हॉटेलवरही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय अखंड वीज आणि पाणी पुरवठ्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
पावणेसात लाख कुंड्या
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रमुख मार्ग व कार्यक्रम स्थळांच्या सजावटींसारखी सहा लाख 75 हजार फूलझाडांच्या कुंड्या व पुष्पसजावटींचा वापर करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतील सरदार पटेल मार्ग, मदर तेरेसा क्रिसेंट, तीन मूर्ती मार्ग, धौला कुआं ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्ग, पालम टेक्निकल एरिया, इंडिया गेट, मंडी हाऊस, अकबर रोड वळणमार्ग, दिल्ली गेट, राजघाट आणि आयटीपीओ या मार्गांवर ही सजावट केली जात आहे.
लक्झरी वाहनांची मागणी वाढली
या शिखर परिषदेला 20 देशांचे प्रतिनिधी येणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी शेकडो लक्झरी वाहने लागणार आहेत. यासाठी प्रशासनाने आपल्या अखत्यारीतील लक्झरी वाहने तर उपलब्ध केली आहेतच; शिवाय खासगी व्यावसायिकांकडूनही वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. इनोव्हा क्रिस्टा, बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज आदी वाहनांची मागणी मोठी आहे. या मागणीला तोंड देण्यासाठी दिल्लीतील व्यावसायिकांनी मुंबई, बंगळूरसह देशाच्या इतर भागांतून वाहने मागवली आहेत. या सहभागी देशांचे अनेक प्रतिनिधी राजधानीशिवाय जयपूर आणि आग्रा येथे भेटी देणार असल्याने तेथेही लक्झरी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.