यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद येथून परत येत असताना तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात यवतमाळ येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. जखमींवर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल मंगळवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ही घटना घडली. अपघाताचे वृत्त कळताच यवतमाळातील वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे.
डॉ. पीयूष बरलोटा, डॉ. संतोष बोडखे, डॉ. मिनल काळे असे तीन कुटुंब यवतमाळातून काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे गेले होते. मंगळवारी तेथून यवतमाळकडे परत येत असताना निर्मल जिल्ह्यातील सोन या गावाजवळ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या कारचा ताबा सुटला. व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मिनल काळे, अनिता बोडखे व इतर दोन मुले गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी डॉ. सुरेखा, मुलगा पार्श व मुलगी पूजा आणि डॉ. संतोष बोडखे, त्यांची पत्नी अनिता व मुलगा, डॉ. मिनल काळे व त्यांचे कुटुंब असे तीन कुटुंब हैदराबादवरून परत येत असताना हा अपघात झाला.