पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश येथील बदायूंमध्ये २ लहान मुलांची हत्या प्रकरणातील संशयित साजीद याच्या इन्काऊंटरचे त्याच्या आईने समर्थन केले आहे. तुम्ही जर गुन्हा केला असेल तर शिक्षाही भोगावीच लागणार, अशा शब्दात साजीदची आई नाजीन यांनी एन्काऊंटर योग्य असल्याचे सांगितले. (Budaun Double Murder)
मंगळवारी सायंकाळी बदायूं येथील सलून दुकान चालक साजीद याने त्यांच्या शेजारी राहात असलेल्या आयुष आणि अहान ठाकूर या दोन लहान मुलांची गळा चिरून हत्या केली होती. साजीदच्या सोबत त्याचा भाऊ जावेदही होता. त्यानंतर झालेल्या पोलिस एन्काऊंटरमध्ये साजीद मारला गेला. (Budaun Double Murder)
साजीदची आई नाजीन यांनी या संपूर्ण प्रकरणात माध्यमांना मुलाखत दिली आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या मुलांनी हा गुन्हा का केला हे मला माहिती नाही. सायंकाळी त्यांनी नाष्टा केला आणि सात वाजता ते घरातून बाहेर पडले. पुढे काय घडले मला माहिती नाही, आणि घरीही कोणता तणाव नव्हता." साजीद आणि जावेद बऱ्याच दिवसांपासून सलूनचे दुकान चालवतात आणि त्यांचा कोणाशीही वाद नव्हता, असेही त्यांनी सांगितले. ही बातमी NDTVने दिली आहे.
त्या म्हणाल्या, "तुम्ही जर गुन्हा केला असेल तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागते. त्यांनी हा गुन्हा केला नसता तर असे काही घडले नसते."
साजीदची बायको गरोदर नसल्याचेही त्यांनी सांगितले. "साजीदला दोन मुले होती, पण त्यांचा फार पूर्वीच मृत्यू झाला आहे."
साजीद आणि मृत मुलाचे वडील विनोद ठाकूर यांची ओळख होती. बायको गरोदर असून तिच्या उपचारासाठी पाच हजार रुपये हवेत, असे सांगत साजीद विनोद यांच्या घरी गेला. विनोद यांची बायको चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या असता साजीदने त्यांच्या दोन मुलांचा गळा चिरून हत्या केली. तर तिसरा मुलगा पियूष याने घरातून पळ काढल्याने तो बचावला.
हेही वाचा