नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने वसाहतवादी प्रथा-पद्धती आणि युनिट्स व रेजिमेंट्सची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लष्कराच्या एका दस्तऐवजामध्ये या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
वसाहतवादी आणि पूर्व-वसाहत काळातील चालीरिती आणि परंपरा, लष्करी गणवेश आणि वेशभूषा, नियम, कायदे, नियम, धोरणे, युनिट स्थापना, वसाहती भूतकाळातील संस्था, काही युनिट्सची इंग्रजी नावे, पुनर्निमित इमारती, आस्थापना, रस्ते, उद्याने, ऑचिनलेक किंवा किचनर हाऊस सारख्या संस्थेचे नाव बदलण्यात येणार आहे, असे यामध्ये म्हटले आहे.
लष्कराच्या मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटिश वसाहतवादी वारसा दूर करताना, पुरातन आणि कुचकामी प्रथांपासून दूर जाणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी लोकांना पाळण्यास सांगितलेल्या पाच प्रतिज्ञांच्या अनुषंगाने राष्ट्रीय भावनेशी जुळवून घेण्यासाठी भारतीय सैन्याने या वारसा पद्धतींचे पुनरावलोकन करणे देखील आवश्यक आहे, असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पुनरावलोकन केल्या जाणाऱ्या यादीमध्ये भारतीयांना रोखण्यासाठी ब्रिटीशांनी दिलेले स्वातंत्र्यपूर्व काळातील सन्मान, युद्धसन्मान, कॉमनवेल्थ ग्रेव्हज कमिशनशी संलग्नता यांचा समावेश आहे. यामध्ये मानद कमिशन आणि बीट द रिट्रीट आणि रेजिमेंट सिस्टमसारखे समारंभ, युनिटमधील नावे आणि बोधचिन्ह, वसाहती काळातील क्रेस्ट, अधिकाऱ्यांच्या प्रक्रिया आणि परंपरा व रितिरिवाजांचे देखील पुनरावलोकन केले जाणार असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा