सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार | पुढारी

सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार

नाशिक रोड: पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडडे पडलेले दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती. त्यावेळी खड्डे दिसले नाहीत का ? त्यांच्याही काळात खड्डे होते अन् आताही आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यावेळी ते खड्डे दादांना दिसत नव्हते. आता दिसतात, अशी टीका केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केली. नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात वेगवेगळ्या चाळीस योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पवार यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रशासनाला खड्डे बुजविण्याचे ओदश देण्यात आले आहेत. यासाठी निधीही कमी नाही. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने काही जागेवर खड्डे बुजविण्यास अडसर निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन प्लँटचा वापर खाजगी उद्योगासाठी करावा, अशीही सूचना त्यांनी केली. पोषण आहार योजनेत येणाऱ्या धान्याची अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. तसेच धान्यांचा दर्जाही तपासावा, असे त्यांनी सांगितले.

६५ हजार घरांना नाव नाही

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नाशिक विभागात ६५ हजार घरांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. पण मला एकाही घरावर पंतप्रधान आवास योजना असे नाव दिसले नाही, असे का होतेय. तरतूदीप्रमाणे प्रत्येक घरांवर नाव हवे. तातडीने नावाची व्यवस्था करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.

प्रमाणपत्र घोटाळयातील दोषीवर कारवाई होणार

नाशिकमध्ये अलिकडेच जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. याविषयी कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

लम्पी जनावरांचे दूध उकळून घ्यावे

नाशिक जिल्हयात तीन कोटींची लम्पी आजाराची लस उपलब्ध आहे. जवळपास ४२ हजार जनावरांना लस दिली आहे. लम्पी आजाराची लागण झालेल्या जनावरांचे दूध उकळून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button