नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या (Brij Bhushan Singh) राजीनाम्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामध्ये कोणताही तोडगा निघताना दिसत नसून घटनात्मक पद्धतीने पदावर निवडून आलेल्या व्यक्तीला कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय हटवता येत नसल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालय खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे बृजभूषण सिंह यांनी आपल्याविरुद्ध हे कारस्थान रचण्यात आले असून आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे.
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासभेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक आणि मानसिक शोषणाचा आरोप केला आहे. आमची सरकारशी चर्चा सुरू असून याप्रकरणी योग्य निर्णय न झाल्यास आमच्याकडे कायदेशीर कारवाईचा मार्गही मोकळा असल्याचे विनेशने सांगितले. (Brij Bhushan Singh)
भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाची क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने गंभीर दखल घेतली आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपले चंदीगड येथील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्ली गाठली आणि या पैलवानांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बजरंग पुनिया, विनेश, साक्षी मलिक, रवी दहिया सहभागी झाले होते; परंतु या बैठकीतून काही विशेष तोडगा निघाला नाही.
विनेशने गुरुवारी दावा केला होता की, तिच्याकडे बृजभूषण यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या वतीने बैठकीत कोणतेही ठोस पुरावे देण्यात आले नाहीत. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने अजून बृजभूषण यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. क्रीडा मंत्रालयाकडून दोन्ही बाजूंशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : बृजभूषण सिंह
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बोलताना ते म्हणाले की, राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही.
वृंदा करात, विजेंदरला स्टेजवरून खाली उतरवले
या आंदोलानाचा राजकीय वापर करू न देण्याचा कुस्तीपटूंनी ठरवले असून गुरुवारी कम्युनिस्ट नेत्या व वृंदा करात यांना कुस्तीपटूंनी स्टेजवरून खाली उतरवले होते, त्यानंतर शुक्रवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी भारताची ऑलिम्पिक पदक विजेता माजी बॉक्सर आणि काँग्रेस नेता विजेंदर सिंह पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर उपस्थित होता. मात्र, एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आंदोलक कुस्तीपटूंनी विजेंदरला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. आंदोलक कुस्तीपटूंना या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नको आहे.
उपाध्यक्ष दर्शनलालही आरोपीच्या पिंजर्यात
अ.भा. कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला. यामध्ये फेडरेशनचे उपाध्यक्ष दर्शनलाल यांनीही महिला कुस्तीपटूचे शोषण केले असल्याचा आरोप विनेश फोगाट हिने केला आहे. तिने मीडियाशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात आपल्याकडे 30 मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असून योग्यवेळी आपण ते सार्वजनिक करू, असे तिने सांगितले. ज्या मुलीचे शोषण झाले ती हरियाणातील नसल्याचेही तिने सांगितले.
हेही वाचा;