पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीच आपल्या बिनधास्त विधानांमुळे चर्चेत राहणारी बॉलीवूडची 'क्वीन' कंगना रनौत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ( Nupur and kangana ) तिने वादग्रस्त विधान करणार्या भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे.
सुमारे दहा दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. याविरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. नपूर शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांना धमकीही मिळाली आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर म्हटलं आहे की, नुपूर शर्मा यांना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण पाहत आहोत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दररोज हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याच्या घटना घडतात. याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाते. तुम्हीही न्यायालयात जा, हिंसाचार करुन दहशत कशासाठी माजवताय, असा सवालही कंगनाने केला आहे.
हे काही अफगाणिस्तान नाही. मला त्यांना सांगायचे आहे की, या देशात लोकशाही मार्गाने आलेले सरकार आहे, असेही कंगनाने म्हटलं आहे.
एकीकडे कंगनाने नुपूर शर्मा यांचे समर्थन केले असताना बॉलीवूडमधील अभिनेत्री स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, अभिनेता गुलशन देवैया यांनी नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला आहे. शर्मा यांच्याविरोधात ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना २२ जून रोजी पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
हेही वाचा :