Latest

Pune News : तरुणांचे विच्छिन्न देह अन् पुण्यातून ‘खांदा’; परदेशातील पार्थिव पोहचविले गावातील नातेवाइकांच्या ताब्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मालदीवमधील एका बेटावर गॅसच्या भीषण स्फोटात दोन भारतीय तरुण ठार झाले. त्यांचे पार्थिव भारतात त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी पुण्यातील 'रेडिओ' या सेवाभावी संस्थेने 'खांदा' दिला अन् हे अवघड काम पूर्ण करत आसाम व बिहार राज्यांतील त्यांच्या गावी पार्थिव पोहचविले. भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विदेशातील भारतीयांना आपत्काळात मदत व्हावी, या उद्देशाने रेडिओ (सेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज) ही संस्था स्थापन केली.

विदेशात भारतीयांना कोणतीही आपत्कालीन मदत हवी असेल तर ही संस्था पुणे शहरातून मोफत काम करते. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धनश्री पाटील या पुणे शहरातून हे काम पाहतात. त्यांच्या प्रयत्नांनी मालदिवमध्ये 22 ऑक्टोबर रोजी गॅसच्या भीषण स्फोटात जीव गमावलेल्या दोन पंचविशीतील तरुणांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहचविता आले.

हा अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंग धनश्री पाटील यांच्याच शब्दांत…

भारतात दसरा सणाची तयारी देशभर सुरू होती. अशा वेळी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मालदीवच्या आमच्या टीमकडून फोन आला. ताई आपल्याला दोन तरुणांचे पार्थिव भारतात त्यांच्या गावी न्यायचे आहे. एका बेटावर गॅसचा स्फोट होऊन दोन भारतीय तरुण मोहम्मद अन्सारी (वय 27, रा. बिहार) व सुधीरा सेठी (वय 25, ओडिशा ) या दोघांचा मृत्यू झाला होता. भारतीय दूतावासाने त्यांचे पार्थिव भारतात पाठविण्याची तयारी केली. पण, तेथून पुढे त्यांच्या गावी ते पार्थिव पोहचविण्याची जबाबदारी मी पुणे शहरातून पार पाडणार होते.

छिन्न-विच्छिन्न झालेले शरीर पाठवायचे कसे..?

या दोन्ही तरुणांचा स्फोटात जागीच मृत्यू झाला. शरीराचे तुकडे 500 फुटांचा परिसर फिरून गोळा केले होते. त्यामुळे ते भारतात आणल्यावर घरापर्यंत पाठविणे हे मोठे अवघड काम होते. कारण, ते शरीर वेगाने खराब होत होते. दुसर्‍या दिवशी दसरा असल्याने असे शरीर पाठवायचे कसे? असा प्रश्न पडला. पण, हिंमत गोळा करीत विचार केला की, इतक्या तरुण वयात गेलेल्या त्या मुलांचे पार्थिव आपण त्यांच्या गावी पोहचवायचेच. तरुणांच्या घरून सारखे फोन येत होते. पण, कायदेशीर मार्गाने कार्यवाही करताना वेळ लागत होता. यात दोन दिवस निघून गेले.

…अन कुटुंबीयांनी रडतच आभार मानले

आमच्या संस्थेच्या मालदीवच्या सहकार्‍यांनी बॉडी पॅक झाल्यानंतर स्पष्टच सांगितले की, दोन्ही शरीरांची परिस्थिती इतकी खराब आहे की, जवळच्या कुटुंबीयांनी देखील ती पाहू नये. आता माझ्या पुढे नवीन आव्हान होते. या दोन्ही कुटुंबीयांना खरी परिस्थिती सांगणे. ते काम मी मोठ्या जड अंतःकरणाने केले. प्रथम बिहारच्या फ्लाइटचे बुकिंग मिळाले. पण, आसामचे मिळेना. शेवटी तिसर्‍या दिवशी आसामचे बुकिंग मिळाले. दोन्ही बॉडी आता खराब होऊन त्यांना दर्प सुटला होता, असे मला आमच्या टीमच्या सदस्यांनी सांगितले. आमच्या मदत करणार्‍या टीमच्या सदस्यांना अशरशः उलट्या सुरू झाल्या. अशाही अवस्थेत आमच्या टीमने ते काम पार पाडले अन् माझा जीव भांड्यात पडला. त्या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी रडतच आमचे आभार मानले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT