तुळजापुरातील सोहळ्यात सोलापूरच्या काठ्या मुख्य आकर्षण | पुढारी

तुळजापुरातील सोहळ्यात सोलापूरच्या काठ्या मुख्य आकर्षण

संजय कुलकर्णी

तुळजापूर :  कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने रविवार, सोमवार असे सलग दोन दिवस महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेची मंदिर परिसरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते सोलापूरच्या शिवलाड तेली समाज अंबाबाई मंदिराच्या दोन काठ्या. या काठ्यांसह निघणार्‍या छबिना मिरवणुकीने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ही मिरवणूक पार पडताच भाविकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सांगतेनंतर शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्रीपासून कोजागरी पौर्णिमेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. यंदा या पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग साधून आला होता. शुक्रवारी तुळजापुरात भाविकांची वर्दळ वाढल्याने प्रशासनाने लगेच सायंकाळी दहा वाजल्यापासून नेहमीचा तुळजापूर-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करुन या मार्गावरील वाहतूक मंगरूळ- इटकळ-बोरामणीमार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. कोजागरी पौर्णिमेसाठी यावर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांसह सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविक तुळजाभवानीमातेच्या नगरीत अनवाणी पायांनी दाखल झाले होते.

मंगळवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर निद्रिस्त करण्यात आलेली मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित झाल्यानंतर रविवारी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन मानाच्या काठ्या व पालखीचे येथे आगमन झाले. या काठ्या तुळजापूरच्या वाटेवर असताना शनिवारी सायंकाळी सिंदफळ येथील ग्रामदैवत असलेल्या मुद्गलेश्वर मंदिरात मुक्कामी राहून रविवारी सकाळी येथील तीर्थात काठ्यांना स्नान घातल्यानंतर बारालिंगांचे दर्शन घेऊन घाटशीळमार्गे या काठ्या तुळजापूर शहरात दाखल झाल्या. या काठ्या घाटशीळ रोडवरुन भवानी रोड, जवाहर चौकातून देवीचे भोपे पुजारी सचिन प्रकाशराव पाटील, व संभाजीराव पाटील यांच्या घरी मुक्कामी विसावल्या.

या काठ्या दोन दिवस मुक्कामी असून या काठ्यांच्या मानकर्‍यांकडून मातेची महापूजा पार पडली. रविवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात श्री तुळजाभवानी मंदिराकडे प्रस्थान ठेवले. या काठ्यांना मातेच्या छबिना मिरवणुकीपुढे मानाचे स्थान आहे. रविवारी मध्यरात्री 12 वाजता घोड्याच्या रथावर मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली. काठ्यांच्या मानकर्‍यांचा जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पेहरावाचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला. छबिना मिरवणुकीच्या विहंगम सोहळ्यानंतर मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी मंदिर परिसरात मागितलेल्या मातेच्या जोगव्याने यात्रेची सांगता झाली.

रविवारी साजरी झाली पौर्णिमा

दसर्‍यानंतर पौर्णिमेला तुळजापुरात प्रचंड गर्दी होती. यंदा पौर्णिमा ही शुक्रवार व शनिवारी होती; मात्र यंदा खंडग्रास चंद्रग्रहणामुळे मातेची मुख्य पौर्णिमा रविवारी (29 ऑक्टोबर) साजरी करण्यात आली.

Back to top button