Latest

BJP Pankaja munde: ‘मी भाजपची, पण भाजप माझी थोडीच…’ पंकजा मुंडे यांचा नाराजीचा सूर

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: 'मी भाजपची, पण भाजप माझी थोडीच' असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आळवला. 'मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही मिळाले नाही तर मी ऊस तोडायला जाईन. कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही', अशा शब्दांत मुंडे (BJP Pankaja munde) यांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे नेते महादेव जानकर तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 'आपण म्हणता ताईचा पक्ष, ताईचा पक्ष. पण माझा कुठला पक्ष? मी भाजपची आहे, पण भाजप माझी थोडीच आहे? भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे आमच्या रक्तातच आहे. काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईन. तर महादेव जानकर मेंढ्या चारायला जातील, अजून काय आहे' असे उद्गार पंकजा मुंडे (BJP Pankaja munde) यांनी यावेळी काढले.

महादेव जानकर यांनी आत्तापर्यंत लग्न केले नसल्याचा उल्लेख मुंडे यांनी केला. यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. यावेळी पंकजा म्हणाल्या जानकर यांनी लग्न केले नाही, त्यामुळे ते नशीबवान आहेत. यामुळे ते समाजासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करु शकतात. कुणीही त्यांच्याकडे गाडी मागणार नाही, घर मागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यामुळेच समर्पित भावनेने काम करु शकतात. त्यांना फक्त या देशातील जनतेची देखभाल करायची आहे, असे मुंडे (BJP Pankaja munde) म्हणाल्या.

नेत्यांची भूमिका कशी असली पाहिजे, यावरही मुंडे यांनी भाष्य केले. मागास वर्गाला पुढे आणणे हे नायकाचे, नेतृत्वाचे काम आहे, ते काम करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला आहे. तुमच्याकडे उद्योगपती किंवा इतर कुणीही असू द्या, पण तुमची नजर सगळ्यात शेवटच्या माणसावर असली पाहिजे, असेही त्या यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT