Latest

सीएम उद्धव ठाकरेंच्या ‘शक्तीस्थळांवर’ भाजपचा ईडी, सीबीआय, आयकरच्या माध्यमातून थेट प्रहार !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आणि भाजप यांच्यातील घनघोर राजकीय संघर्षात आज आणखी एक अध्याय जोडला गेला आहे. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आणि भाजपच्या नाकात दम करून ठेवलेल्या संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई करत त्यांची अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे.

या कारवाईने भाजपने सीएम उद्धव ठाकरे यांच्या शक्तीस्थळांवर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ईडीने आपला मोर्चा फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार थेट पाडण्यासाठी कोणताच मार्ग भाजपला दिसत नसल्याने ईडीच्या माध्यमातून सरकारवरील दबाव दिवसागणिक वाढेल याची काळजी घेतल्याचे दिसून येते. येत्या मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत शिवसेना होईल तितकी बदनाम तपास यंत्रणांचा वापर करून करायची असा डावही भाजपचा स्पष्ट दिसून येत आहे.

नवाब मलिक अटकेत गेल्यानंतर ईडीने मुंबई महापालिकेतील स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि भाजप आणि ईडीला एकाचवेळी अंगावर घेतलेल्या संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. मातोश्रीपर्यंत ईडीची कारवाई आता येऊन पोहोचली आहे अशीच चर्चा सुरु झाली आहे.

यशवंत जाधव यांच्यावर कारवाई

स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार अशा तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल १३० कोटी रुपये किंमतीच्या तीन डझन स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल २०० कोटींचे उत्पन्न लपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने या कारवाईत २ कोटींच्या रोख रकमेसह सुमारे दीड कोटींचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजेच आई म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे.

श्रीधर पाटणकर यांचीही संपत्ती जप्त

पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियनविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे 11 फ्लॅटस् जप्त केले आहेत हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीने हमसफर डिलर्स प्रा. लि. या बनावट कंपनीद्वारे पाटणकरांना दिलेल्या 30 कोटी रुपयांतूनच हे फ्लॅटस् 'पुष्पक'ने खरेदी केले, असा 'ईडी'ला संशय आहे. या 11 फ्लॅटस्ची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये दाखवण्यात आली आहे.

शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेतेही ईडीच्या रडारवर

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही ईडी आणि किरीट सोमय्यांच्या रडारवर आहेत. दापोलीमधील अनधिकृत रिसॉर्ट आणि आरटीओ बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीचा दणका बसला आहे. एनएसईल कंपन्यांमधून त्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे आल्याचा आरोप असून ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरही ईडीने ५ संस्थावर छापेमारी केली आहे. त्यांच्यावर १०० कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे अर्जुन खोतकर यांच्यावर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरही ईडीने छापेमारी केली आहे. आमदार रविंद्र वायकर यांच्यावर छापेमारी झाली नसली, तरी त्यांच्यावर अलिबागमधील कोर्लई गावात ३० जमीनी करार बंगले खरेदीची प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. माजी मंत्री आनंदराव आडसूळ यांच्यावरही सिटी बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असून त्यांच्यावरही ईडीने छापेमारी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपची सत्तेविना तडफड लपून राहिलेली नाही. शिवसेना आपल्या ताटाखालील मांजर आहे अशीच भाजप नेत्यांची समजूत झाली होती. मात्र, अनपेक्षित राजकीय घडामोडींनी राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याने भाजपला विरोधी बाकावर जाऊन बसावे लागले.

अडीच वर्ष होऊनही आणि महिन्याला नवीन मुहूर्त देऊनही सरकार पडत नसल्याने भाजपची अस्वस्थता जास्तच वाढत चालली आहे.  ईडी कारवाईवर नजर टाकल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. ईडीला काँग्रेसची आठवण करून द्यावी असे भाजपला आजघडीला, तरी वाटत नसल्याचे झालेल्या कारवाईवरून दिसते.

महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष होऊनही पाडण्यात यशस्वी होता येत नसल्याने राज्यातील भाजपने ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा खुबीने वापर करून ठाकरे सरकारची पुरती कोंडी करून ठेवली आहे. सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या जेलमध्ये आहेत.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT