नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य मणिपूर गेल्या दोन महिन्यांहून हिंसाचाराने धगधगत आहे. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर टीकास्त्र डागले. आता विरोधकांची आघाडी 'इंडिया' चे २० खासदार मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी खासदारांच्या मणिपूर दौऱ्यावर निशाणा साधला आहे. 'हा केवळ दिखावा आहे' अशा शब्दात ठाकूर यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला.
"इंडिया आघाडीतील काही खासदार मणिपूरला गेले आहेत. हा फक्त दिखावा आहे. यांचे सरकार असताना मणिपूर जळत होते. कित्येक महिने मणिपूर बंद असायचे. पंरतु, त्यावेळी यांचे नेते संसदेत एक शब्दही उच्चारत नव्हते. अनेकांचा मृत्यू झाल्यावर यांचे नेते भाष्य करायचे," असे शब्दात ठाकूर यांनी टीकास्त्र डागले आहे.
मणिपूरचा दौरा आटोपल्यावर इंडियाच्या खासदारांनी पश्चिम बंगालचा दौरा करावा. मणिपूर दौऱ्यात काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी सुद्धा आहेत. पश्चिम बंगालमधील महिलांवर होणाऱ्या अत्यांचाराबद्दल त्यांचे मत काय? ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये सर्व काही ठीक सुरु आहे का? अधीर रंजन चौधरी इंडियातील खासदारांना पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर बोलावणार आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्ती देखील ठाकूर यांनी विरोधी खासदारांवर केली.