Latest

मुंबईत भाजपाचे माफी मागा आंदोलन : महाविकास आघाडीतील नेत्यांना केले लक्ष्य

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकारने शनिवारी काढलेल्या महामोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मुंबईसह पश्चिम व पुर्व उपनगरांत शनिवारी माफी मागो आंदोलन केले. या वेळी भाजपाकडून उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले माफी मागा, पाकिस्तान हाय हाय अश्या घोषणा देत निषेध नोंदविला. आंदोलनात वारक-यांच्या दिंड्याही सहभागी झाल्या होत्या.

हिंदू-देवदेवता व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीतील नेते, विशेषत: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे तसेच परमपूज्य महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणारे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्याविरोधात भाजपाने निदर्शने केली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध ही यावेळी करण्यात आला. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कांदिवली रेल्वे स्थानक, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक, घाटकोपर पूर्व, दादर पूर्व रेल्वे स्थानक, भाजप प्रदेश कार्यालयाजवळ, स्वा. सावरकर पुतळा, विलेपार्ले या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी देत 'माफी मागो' आंदोलन करण्यात आले. टाळ मृदंगाचा गजर करीत वारकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच एकनाथ महाराज यांचा अपमान करणाऱ्या अंधारे यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.

याप्रसंगी आ.दरेकर म्हणाले की, लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेत आहेत. संजय राऊत यांनी आवाहन केले होते सरकारने रस्त्यावर उतरावे. पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा इकडे आले आहेत. सरकार रस्त्यावर उतरले आहे ते तुमची नौटंकी लोकांसमोर आणण्यासाठी. जे काही लोकांसमोर खोटे चित्र उभे करताय त्याविरोधात हे आंदोलन आहे".

सुषमा अंधारे यांनी संतांचा अपमान करायचा, छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा अपमान करायचा, जे ज्ञानी संपादक विश्वव्यापी संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी बोलताहेत बाबासाहेबांचा जन्म ९१,९२, ९३ कि ९४ साली झाला. यांना लाज कशी वाटत नाही. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी ह्यांना जोड्याने मारले पाहिजे, असही दरेकर म्‍हणाले.

आ. भातखळकर म्‍हणाले,  "हा आक्रोश मोर्चा नसून हा थयथयाट मोर्चा आहे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली. संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे. त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे, असेही भातखळकर म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT