मलालासारखे धाडसी व्हा ! नेहमी पालकांच्या इच्छेनुसार वागण्याची गरज नाही, उच्च न्यायालयाने दिला तरुणीला सल्ला | पुढारी

मलालासारखे धाडसी व्हा ! नेहमी पालकांच्या इच्छेनुसार वागण्याची गरज नाही, उच्च न्यायालयाने दिला तरुणीला सल्ला

पुढारी ऑनलाईन: शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयासमोरील हेबियस कॉर्पस प्रकरणातील एका कार्यवाहीमध्ये खंडपीठ आणि एक स्त्री यांच्यात मनोरंजक संवादाची देवाण घेवाण झाली. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मलाला युसुफझाई प्रमाणे “जीवनात धैर्याने उडी मारण्याचा” सल्ला एका तरुण महिलेला दिला.

शुक्रवार १६ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठासमोर एक हेबियस कॉर्पस याचिका सुनावणीसाठी आली. ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलाला त्याच्या पत्नीच्या पालकांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता.

या केसच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्याची पत्नी झूमवरून सहभागी झाली. तिने खंडपीठातील न्यायमूतींशी संवाद साधला. त्यावेळी ती पूर्णपणे ठाम होती की, तिला तिच्या मुलासोबत जायचे आहे आणि पतीसोबत राहायचे आहे.

न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तिने सांगितले की, तिचे पालक या जोडप्याला लग्न पुढे नेण्याच्या बाजूने नसले तरी आता तिला जे करायचे आहे त्यासाठी ती उभी आहे. त्यावर न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस यांनी न्यायमूर्ती सोफी थॉमस यांना विचारले, ” कोणती तरुण मुलगी होती जिला नोबल पारितोषिक मिळाले? ती तशी दिसते. ”

मग त्या महिलेकडे वळून न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस म्हणाले, मलालासारखे धाडसी व्हा. जीवनात धाडसाने उडी घ्या. नेहमी तुमच्या पालकांच्या इच्छेप्रमाणे करण्याची गरज नाही. याचिकाकर्ता पती आणि पत्नी दोघांनाही एकत्र राहायचे आहे, असे सांगितल्यानंतर त्यांच्या समुपदेशन सत्रातील अहवाल आणि रेकॉर्डवरील इतर कागदपत्रे तपासली. त्यांनतर न्यायालयाने या जोडप्याचे म्हणणे नोंदवून घेत याचिका निकाली काढली.

तथापि, सुनावणी संपण्यापूर्वी न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस यांनी या तरुणीला तिचा अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. कारण तिने 12वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला नव्हता.

” तुम्ही इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी किंवा इतर काही अभ्यासक्रमात का प्रवेश घेत नाही?, ” न्यायाधीशांनी विचारले.

त्यावर ” मला अभ्यास करायचा आहे. मला एमबीबीएसची पदवी हवी आहे. मी जॉर्जियामध्ये शिकणार आहे. माझ्या प्रवेशाची आणि बाकीच्या गोष्टींची तयारी आधीच झालेली आहे, ” तिने उत्तर दिले.

Back to top button