मुंबई; पुढारी ऑनलाईन ; शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी त्यांचे मुंबईत निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी ६.४५ वाजता निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले ६२ वर्षीय झुनझुनवाला हे स्टॉक मार्केट ट्रेडर आणि चार्टर्ड अकाउंटंट होते. ते हंगामा मीडिया (Hungama Media) आणि अॅपटेकचे (Aptech) अध्यक्ष तसेच व्हाइसरॉय हॉटेल्स (Viceroy Hotels), कॉन्कॉर्ड बायोटेक, प्रोव्होग इंडिया आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक होते.
राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हटले जाते. त्यांना शेअर बाजारातील बिग बुलही म्हणून ओळखले जाते. आकासा एअरमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची मोठी गुंतवणूक आहे. दोघांची एकूण भागिदारी ४५.९७ टक्के एवढी आहे. गेल्या महिन्यात ५ जुलै रोजी त्यांचा जन्मदिवस होता. ३६ वर्षापूर्वी त्यांनी केवळ ५ हजार रुपयांत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. ते सध्या ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटटमधून सीएची पदवी घेतली आहे.
झुनझुनवाला RARE एंटरप्राइजेज नावाच्या खासगी ट्रेडिंग फर्म चालवतात. या फर्मची सुरुवात त्यांनी २००३ मध्ये केली. या कंपनीचा पहिला शब्द 'RA' असा त्यांच्या नावावरुन आहे. तर 'RE' हा शब्द त्यांच्या पत्नीच्या नावाच्या सुरुवातीचा शब्द आहे. हल्लीच त्यांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
हे ही वाचा :