पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील नवादा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गर्भधारणा करू शकत नसलेल्या महिलांना गर्भधारणा करण्यासाठी पुरूषांना १३ लाख रुपयांची ऑफर दिली जात होती. याप्रकरणी बिहारमध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ते 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस' या नावाखाली हे रॅकेट चालवत होते. हे जाळे देशभर पसरले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
बिहार पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) २९ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून नऊ स्मार्टफोन, सिम, एक प्रिंटर आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब नावाचा हा ग्रुप लोकांना अडकवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत होता. ही टोळी लोकांना या ऑफरची माहिती देवून नोंदणीच्या नावाखाली पैसे उकळत होते. गुप्त माहितीच्या आधारे या सायबर स्कॅमरच्या टोळीचा मुख्य सूत्रधार मानल्या गेलेल्या मुन्ना कुमारशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकला, त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी सांगितले की, गुरमा हे गाव या टोळीचे मुख्य ठिकाण होते. कथितपणे ज्या महिलांना त्यांच्या जोडीदारासह गर्भधारणा होत नाही, अशा महिलांना गर्भधारणा करण्यासाठी आरोपी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधत. त्यांना या बदल्यात १३ लाख कमावण्याची ऑफर देत. इच्छुक पुरुषांना ७९९ रूपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगत. नोंदणी केल्यानंतर संबंधित पुरूषाला महिलांचे फोटो पाठवले जात आणि त्यांना त्यांच्या आवडीची महिला निवडण्यास सांगितले जायचे जिला गर्भधारणा करायची आहे. महिला गरोदर राहिल्यास संबंधित पुरूषाला १३ लाख दिले जातील, असे पुरुषांना सांगितले जायचे. जर ते महिलेला गर्भधारणा करण्यात अयशस्वी झाले तरीही त्यांना ५ लाख रूपये दिले जातील असा विश्वास द्यायचे आणि नंतर सुरक्षा रक्कम म्हणून ५ ते २० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घ्यायचे.
याप्रकरणी गुप्त माहिती मिळताच नवादा पोलिसांच्या एसआयटीने मुन्ना कुमार नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. मुन्ना हा या संपूर्ण टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील आठ जणांना अटक केली आहे, तर सुमारे १८ जण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा :