Latest

नितीशकुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? प्रशांत किशोर यांची भाजपविरोधात रणनीती!

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतात. बिगर काँग्रेस विरोधी पक्ष या रणनीतीवर काम करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही मोहीम सुरू केली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांची यामागे रणनीती असल्याचे बोलले जात आहे. या महिन्यात केसीआर आणि पीके यांची हैदराबादमध्ये भेट झाली तेव्हा नितीश कुमार यांना राष्ट्रपती बनवण्याची चर्चा सुरू झाली. तेलंगणा निवडणुकीत पीकेची टीम यावेळी केसीआर यांच्या टीआरएस पक्षासाठी काम करेल. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नितीश यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर नितीश कुमार आणि प्रशांत किशोर हे पाटण्यात डिनरसाठी भेटले होते.

याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजप असे युतीचे सरकार आहे. मात्र जात जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. या मुद्द्यावर आरजेडी नितीश कुमार यांच्यासोबत आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि के. चंद्रशेखर राव यांच्यातही बैठक झाली आहे. या बैठकीतही राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर राव यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या बैठकीतही राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून याकडे माध्यमांमध्ये पाहिले जात आहे. पण ही रणनीती राष्ट्रपती निवडणुकीबाबत आहे. यापुढे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यामध्ये सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे. आणखी काही प्रादेशिक पक्षांना या मोहिमेशी जोडण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत भाजपच्या विरोधात एवढा तगडा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. जेणेकरून काँग्रेसही त्या उमेदवाराला पाठिंबा देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT