जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. आज (दि.३०) गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनातून होणारी गांजा तस्करी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गस्ती दरम्यान रोखत ३३ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhusawal Police)
गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री अडीचच्या सुमारास मारुती स्वीप्ट क्रमांक (एम.एच.०१ बी.टी.६६८२) या वाहनाची तपासणी केली.
दरम्यान वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. यात मागील बाजूस असलेल्या डिग्गीमध्ये प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रकरणी विजय वसंत धीवरे (४५) व नंदकिशोर हिरामण गवळी (२८) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गांजाची मोजणी केल्यानंतर तो ३३ किलो आढळून आला. त्याचे बाजारमूल्य एक लाख ६५ हजार असून पाच लाखांचे वाहन जप्त करण्यात आले.